सर्वांची उत्सुकता ताणून धरलेल्या यंदाचे इंडियन प्रीमियर लीगचे सत्र अखेर प्ले आॅफमध्ये पोहोचले आहे. विशेष म्हणजे साखळी फेरी संपण्यास दोन दिवस शिल्लक राहिले असतानाही प्ले आॅफमधील तिसरा संघ निश्चित झाला नव्हता. तसेच, स्पर्धेतील सगळे ५६ साखळी सामने पार पडल्यानंतर गुणतालिकेचे अंतिम स्वरूप स्पष्ट झाले. यावरूनच आयपीएलमधील उच्च कौशल्य आणि खेळाचा उच्च दर्जा स्पष्ट होतो. शिवाय सर्व आठ संघांतील ठासून भरलेली गुणवत्ताही समोर आली.
यंदा अनेक सामन्यांमध्ये २०० हून अधिक धावसंख्या पार करण्यात संघ यशस्वी ठरले. विशेष म्हणजे हे सामने एकतर्फी झाले नाहीत. त्याचप्रमाणे, काही सामन्यांत फलंदाजी व गोलंदाजी यांच्यामध्ये समान लढत पाहण्यास मिळाली, तर काही ठिकाणी खेळपट्टीकडून गोलंदाजांना पुरेपूर साथ मिळाली. मनगटी फिरकी गोलंदाजांनी यंदा आपली विशेष छाप पाडली. तसेच या वेळी अनेक विविधता व अष्टपैलू खेळींनीही लक्ष वेधले. शिवाय यंदाच्या सत्रात अनेक युवा भारतीय खेळाडूंनी सर्वांचे लक्ष वेधले. मोठ्या प्रमाणात युवा भारतीयांची गुणवत्ता समोर आली आणि हेच आयपीएलचे मूळ उद्दिष्टही आहे. याशिवाय केन विलियम्सन आणि महेंद्रसिंग धोनी या खेळाडूंनी आपला प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर संघांना विजयी केले. या दिग्गजांच्या जोरावर संघांनी गुणतालिकेत अव्वल दोन स्थानी कब्जाही केला.
आतापर्यंत जे काही झाले त्याचा अंतिम निकाल आता, या आठवड्यात मिळेल. आता बाद फेरीची वेळ असून येथे सर्व काही गुणवत्ता किंवा कौशल्य असणे गरजेचे नाही, तर दबावाच्या परिस्थितीमध्ये तुम्ही कशी कामगिरी करता हे महत्त्वाचे ठरणार आहे. या रोमांचक स्थितीची सुरुवात मंगळवारपासून होणार असून आम्ही चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध पहिल्या क्वालिफायर सामन्यासाठी खेळू.
प्ले आॅफमध्ये मोठ्या फरकाने व दिमाखदार विजयासह हैदराबादने प्रवेश करायला पाहिजे होता. परंतु, आम्हाला दुर्दैवाने सलग तीन पराभव पत्करावे लागले. कुठे सुधारणा करण्याची गरज आहे, हे आम्ही जाणतो. संपूर्ण सत्रात आमचा भर प्रक्रियेवर अधिक होता आणि आम्ही निकालावर अधिक लक्ष दिले नाही. आम्ही सकारात्मक कामगिरीवर लक्ष केंद्रित केले व नऊ विजयांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. सातत्यपूर्ण कामगिरीचे आम्हाला फळ मिळाले असून आम्ही अव्वल दोन स्थानांमध्ये जागा मिळवली. आता जिंकलेल्या नऊ सामन्यांतील कामगिरीचे विश्लेषण करून मजबूत बाजूंवर अधिक भर देऊन चेन्नईच्या आव्हानाला सामोरे जाऊ. वैयक्तिकरीत्या या आठवड्यात होणाऱ्या रोमांचक घडामोडींसाठी मी खूप उत्सुक आहे.