Join us

Qualifier 2, DC vs SRH : गचाळ क्षेत्ररक्षणाचा SRHला फटका; शिखर धवनच्या अर्धशतकाच्या जोरावर DCचा धावांचा डोंगर

Indian Premier League ( IPL 2020)च्या १३व्या पर्वात सातत्यपूर्ण कामगिरी करून प्ले ऑफमध्ये प्रवेश करणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघानं क्वालिफायर २ सामन्यात दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) विरुद्ध सर्वांना निराश केलं.

By स्वदेश घाणेकर | Updated: November 8, 2020 21:22 IST

Open in App

Indian Premier League ( IPL 2020)च्या १३व्या पर्वात सातत्यपूर्ण कामगिरी करून प्ले ऑफमध्ये प्रवेश करणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघानं क्वालिफायर २ सामन्यात दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) विरुद्ध सर्वांना निराश केलं. गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या आघाड्यांवर SRHचे खेळाडू अपयशी ठरले. त्यात DCनं मार्कस स्टॉयनिसला ( Marcus Stoinis) सलामीला पाठवलेला डाव यशस्वी ठरला. शिखर धवन ( Shikhar Dhawan) फॉर्मात आला आणि त्याच्या अर्धशतकाच्या जोरावर DCनं मोठा पल्ला गाठला. शिमरोन हेटमारयनंही फटकेबाजी केली.

दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉच्या जागी संघात अजिंक्य रहाणेला संधी दिली. पृथ्वीच्या अनुपस्थितीत अजिंक्य व शिखर धवन हे सलामीला येतील अशी अपेक्षा होती, परंतु कर्णधार श्रेयस अय्यरनं गब्बरसह सलामीला मार्कस स्टॉयनिसला पाठवून मोठा डाव खेळला. DCची ही खेळी यशस्वी ठरली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८६ धावा चोपल्या. राशिद खाननं SRHला पहिलं यश मिळवून दिलं. स्टॉयनिस ३८ धावांवर त्रिफळाचीत झाला. पण, धवन दुसऱ्या बाजूनं दमदार खेळ सुरूच ठेवला. त्यानं २६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. चांगल्या सुरुवातीमुळे दिल्ली कॅपिटल्सच्या अन्य फलंदाजांचाही आत्मविश्वास उंचावलेला दिसला. 

श्रेयस अय्यरसह धवननं दिल्लीच्या धावांचा वेग कायम ठेवला होता. अय्यर-धवन जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी ४० धावा जोडल्या. जेसन होल्डरनं ही जोडी तोडली. अय्यर २१ धावांवर माघारी परतला. आज हैदराबादच्या खेळांडूकडून क्षेत्ररक्षणातही चुका झाल्या. त्याचाच फायदा आज दिल्लीच्या फलंदाजांनी पुरेपूर उचलला. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला हादरवून सोडणाऱ्या जेसन होल्डरचीही DCनं धुलाई केली. बढती मिळालेल्या शिमरोन हेटमायरनंही चांगले हात धुऊन घेतले. होल्डरच्या चार षटकांत DCच्या फलंदाजांनी ५० धावा कुटल्या.

संदीप शर्मानं १९व्या षटकात धवनला ( ७८ धावा, ६ चौकार व २ षटकार) बाद केले. त्यानं हेटमायरसह तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. हेटमायर २२ चेंडूंत ४२ धावांवर नाबाद राहिला. दिल्लीनं ३ बाद १८९ धावा केल्या. 

टॅग्स :IPL 2020शिखर धवनसनरायझर्स हैदराबाददिल्ली कॅपिटल्स