पुणे : किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघ आयपीएलमधील अखेरच्या सुपरसाखळीत रविवारी परस्परांपुढे उभे ठाकतील तेव्हा ‘प्ले आॅफ’साठी विजयासह धावसरासरी वाढविण्याचेही आव्हान असेल.
पंजाबने सलग विजयाच्या सत्राची सुरुवात केल्यानंतरही १२ गुणांसह हा संघ सातव्या स्थानी आहे. मुंबई, राजस्थान, आरसीबी यांचे प्रत्येकी १२ गुण असून, सर्वच संघांचा एक सामना शिल्लक आहे. पंजाब संघ सांघिक योगदानात अपयशी ठरला. लोकेश राहुलशिवाय (६५२ धावा) एकाही फलंदाजाने सातत्यपूर्ण कामगिरी केलेली नाही. याआधी मुंबईविरुद्ध हा संघ अवघ्या ३ धावांनी पराभूत झाला. ख्रिस गेल सुरुवातीला चमकल्यानंतर ‘फ्लॉप’ ठरला. अॅरोन फिंच, करुण नायर, मयंक अग्रवाल आणि युवराजसिंग हे संघाच्या मदतीला धावून आले नाहीत.
चेन्नई सुपरकिंग्जने आधीच प्ले आॅफमध्ये स्थान मिळविले आहे; पण अव्वल २ स्थानांवर राहण्यासाठी त्यांनाही विजय हवा आहे. काल दिल्लीकडून झालेल्या पराभवामुळे फलंदाजीतील उणीव चव्हाट्यावर आली. या चुकांवर मात करून अंबाती रायुडू, शेन वॉटसन, धोनी,
रैना, ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जडेजा यांना विजयासाठी शंभर टक्के योगदान द्यावे लागेल. दीपक चाहर दुखापतीतून सावरल्यानंतर चेन्नईच्या आक्रमणाला धार आली. त्याच्या सोबतीला ब्राव्हो आणि शार्दूल ठाकूर आहेतच. फिरकीची भिस्त पुन्हा एकदा हरभजनसिंग आणि जडेजा यांच्यावर असेल.
वेळ : रात्री ८ वाजता
स्थळ : एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, गहुंजे