पंजाब, दिल्लीची कामगिरी लक्षवेधी

आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून सांघिक खेळ बघायला मिळालेला नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 01:22 IST2019-04-20T01:21:51+5:302019-04-20T01:22:03+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Punjab, Delhi's performance target | पंजाब, दिल्लीची कामगिरी लक्षवेधी

पंजाब, दिल्लीची कामगिरी लक्षवेधी

- अयाझ मेमन
आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून सांघिक खेळ बघायला मिळालेला नाही. केवळ एकच सामना जिंकण्यात त्यांना यश मिळाले. सातवा सामना त्यांनी जिंकला आणि पुन्हा आठव्या सामन्यात ते पराभूत झाले. एकूणच यंदाच्या सत्रात आरसीबीची कामगिरी खूपच निराशाजनक झाली आहे. यंदाच्या सत्रातील अनपेक्षित कामगिरी करून लक्ष वेधलेल्या संघाविषयी म्हणायचे झाल्यास किंग्ज इलेव्हन पंजाबचे नाव घेता येईल.
गुणतालिकेत बऱ्यापैकी झेप घेतलेल्या या संघातील खेळाडूंमध्ये विजयाची भूक दिसून येते. तसेच त्यांच्यातील जोश कौतुकास्पद आहे. रविचंद्रन अश्विन गोलंदाजीसह कर्णधारपदही अप्रतिमरीत्या सांभाळत आहे. पंजाबचे फलंदाजही मोक्याच्या वेळी छाप पाडत आहेत. विशेष करून लोकेश राहुल आणि ख्रिस गेल फॉर्ममध्ये आहेत. तरी गोलंदाजीत अजूनही हा संघ काहीसा कमजोर दिसत आहे. कारण ते ५ प्रमुख गोलंदाजांवर जास्त निर्भर आहेत. त्यांना अतिरिक्त किंवा पर्यायी गोलंदाजाची कमतरता भासू शकते. पण आतापर्यंतच्या कामगिरीवर नजर टाकल्यास पंजाबने लक्ष वेधले आहे.
यासोबतच दिल्ली कॅपिटल्सची कामगिरीही कौतुकास्पद आहे. त्यांना गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध भलेही पराभव पत्करावा लागला, पण त्यांनी यंदा सर्वांना चकित केले आहे. दिल्लीकर आपल्या घरच्या मैदानावर पराभूत होत असून बाहेरच्या मैदानावर मात्र बाजी मारत आहेत. जर त्यांनी घरच्या मैदानावरही विजयी कामगिरी केली, तर त्यांच्यासाठी याहून दुसरी चांगली बाब राहणार नाही.
दुसरीकडे, आता बहुतेक प्रमुख संघांनी विश्वचषकासाठी आपले संघ जाहीर केले असून या जागतिक स्पर्धेची उत्सुकता वाढली आहे. पाकिस्तानने मोहम्मद आमिर या आपल्या सर्वांत उत्कृष्ट वेगवान गोलंदाजाला संघात घेतले नाही. दक्षिण आफ्रिकेने पुन्हा एकदा आपला अनुभवी फलंदाज हाशिम आमला याला संघात स्थान दिले आहे. आमला लौकिकानुसार खेळ करण्यात यशस्वी ठरला, तर दक्षिण आफ्रिका धोकादायक संघ बनेल. कारण त्यांची गोलंदाजी खूप मजबूत आहे. यजमान इंग्लंडविषयी म्हणायचे झाल्यास आयपीएलमध्ये छाप पाडलेल्या जोफ्रा आर्चर याला संघात स्थान मिळालेले नाही. तसेच श्रीलंकेने दिनेश चांदिमलला संघात ठेवले नाही. तरी या सर्व संघांमध्ये येत्या २३ मेपर्यंत काही बदलही दिसून येतील.

(संपादकीय सल्लागार)

Web Title: Punjab, Delhi's performance target

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.