Join us  

मुंबईच्या क्रिकेटपटूला पुद्दुचेरीची ऑफर

पुद्दुचेरीचा संघ आगामी रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. पहिल्याच स्पर्धेत दमदार कामगिरी करण्यासाठी पुद्दुचेरी संघाने कंबर कसली असून त्यांनी क्रिकेटच्या पंढरीतील म्हणजेच मुंबईतील एका वरिष्ठ खेळाडूला त्यांच्याकडून खेळण्याची ऑफर दिली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 3:54 PM

Open in App
ठळक मुद्देभारताचा माजी क्रिकेटपटू अभिषेक नायरला पुद्दुचेरी क्रिकेट असोसिएशनने प्रस्ताव पाठवला आहे.

मुंबई - केंद्रशासित प्रदेशातील संघाला स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभागी करून घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकिय समितीने दिले होते. त्यानुसार पुद्दुचेरीचा संघ आगामी रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. पहिल्याच स्पर्धेत दमदार कामगिरी करण्यासाठी पुद्दुचेरी संघाने कंबर कसली असून त्यांनी क्रिकेटच्या पंढरीतील म्हणजेच मुंबईतील एका वरिष्ठ खेळाडूला त्यांच्याकडून खेळण्याची ऑफर दिली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू अभिषेक नायरला पुद्दुचेरी क्रिकेट असोसिएशनने प्रस्ताव पाठवला आहे. अभिषेक डावखुरा फलंदाज आहे आणि त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय सामन्यांचाही अनुभव आहे. आम्ही रणजी स्पर्धेत पदार्पण करत आहोत आणि अभिषेकच्या उपस्थितीने संघातील खेळाडूंचे मनोबल उंचावेल, असे मत पुद्दुचेरी क्रिकेट असोसिएशनचे सचिव पी. दामोदरन यांनी व्यक्त केले. नायरने 99 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्याला गतवर्षी त्रिपुराविरूद्धच्या महत्वाच्या लढतीत बाकावर बसवण्यात आले होते. तसेच त्याला विजय हजारे चषक आणि सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेतूनही संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर मुंबई संघाच्या शिबीरातही समाविष्ट करण्यात न आल्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून या 34 वर्षीय खेळाडूला जाणीवपूर्वक बाजूला सारले जात असल्याच्या चर्चा आहेत. कोलकाता नाईट रायडर्सचा मार्गदर्शक असलेल्या नायरला दिनेश कार्तिकच्या यशाचे श्रेय जाते. पुद्दुचेरीकडून त्याला प्रशिक्षकपदाची ऑफर दिली जाऊ शकते. मात्र खेळाडू म्हणून पुद्दुचेरी संघाचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा त्याक्त केली आहे. त्यांनी मला प्रशिक्षक आणि खेळाडू  अशा दोन्ही भुमिका सांभाळण्याचा प्रस्ताव दिला आहे. पण मला खेळाडूच्या भुमिकेत राहायचे आहे. त्यामुळे त्यांच्या प्रस्तावावर मी निर्णय घेतलेला नाही, असे नायरने सांगितले.           

टॅग्स :रणजी करंडकमुंबईक्रिकेटक्रीडा