- अयाझ मेमन
पाकिस्तानचा स्टार क्रिकेटपटू उमर अकमल याच्यावर तीन वर्षांची बंदी लादण्यात आली आहे. एका सट्टेबाजाने आपल्याशी संपर्क साधल्याची माहिती त्याने लपवली होती आणि त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डने (पीसीबी) त्याच्यावर बंदीची कारवाई केली. उमर अकमलचे वय २९-३० असे आहे आणि त्यामुळे आता त्याच्या कारकिर्दीला पूर्णविराम लागणार असल्याचे दिसत आहे.
असे नाही की खेळाडू ३८-४० वर्षांपर्यंत खेळू शकणार नाहीत. परंतु, तीन वर्षांचा खंड खूप मोठा असतो. अकमलची बंदी केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी नसून सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे स्पर्धात्मक क्रिकेटपासून त्याला दूरच राहावे लागणार आहे. या निर्णयामुळे दु:खही होते, कारण अकमल एक गुणवान खेळाडू आहे, सुपरस्टार आहे; पण या सट्टेबाजीच्या चक्रव्यूहामध्ये तोही अडकला.
पण तरी माझ्या मते ही समस्या केवळ पाकिस्तानपुरती मर्यादित नसून प्रत्येक देशामध्ये ही समस्या आहे. बांगलादेशचा सर्वात दिग्गज क्रिकेटपटू शाकिब अल हसनही सध्या क्रिकेटपासून दूर आहे. त्याने गेल्याच वर्षी विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त छाप पाडली. मात्र, त्यानेही सट्टेबाजांनी आपल्याशी संपर्क साधल्याची माहिती बांगलादेश क्रिकेट बोर्डला दिली नाही आणि त्याच्यावरही दोन वर्षांच्या बंदीची कारवाई झाली.
>गेल्या ६-८ महिन्यांमध्ये सट्टेबाजीशी संबंध आलेला अकमल पाकिस्तानचा तिसरा क्रिकेटपटू आहे. याआधी शार्जिलखान आणि दुसरा नासीर जमशेद. सट्टेबाजीशी जुळलेली प्रकरणे जास्त करून पाकिस्तानमध्येच समोर येतात आणि आकडे पाहिल्यास यामध्ये तथ्य असल्याचेही दिसून येईल.