Join us  

दुखापतग्रस्त पृथ्वी शॉची 'क्रिकेटच्या देवा'कडे धाव; लवकरच करणार कमबॅक

कसोटी क्रिकेटच्या पहिल्याच सामन्यात शतक ठोकणारा मुंबईचा युवा फलंदाज पृथ्वी शॉला दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर बसावे लागले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 12:00 PM

Open in App

मुंबई : कसोटी क्रिकेटच्या पहिल्याच सामन्यात शतक ठोकणारा मुंबईचा युवा फलंदाज पृथ्वी शॉला दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर बसावे लागले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत सलामीवीर म्हणून पृथ्वीचा संघात समावेश करण्यात आला होता, परंतु सराव सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे त्याला मायदेशात परतावे लागले. दुखापतीतून सावरत असलेल्या पृथ्वीने नुकतीच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची भेट घेतली. पृथ्वीने दुखापतीतून सावरल्यानंतर पुन्हा कमबॅक करण्यासाठी तेंडुलकरचा सल्ला घेतला.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पृथ्वीला अन्य वरिष्ठ सहकाऱ्यांकडून  अनेक महत्त्वाच्या टिप्स मिळाल्या होत्या. आंतरराष्ट्रीय स्थरावर मिळणाऱ्या प्रसिद्धीची हवा डोक्यात जाऊ देऊ नकोस, असा सल्ला अनेक वरिष्ठ सहकाऱ्यांनी पृथ्वीला दिला होता. कमी वयात यशोशिखरावर पोहोचलेल्या पृथ्वीने दुखापतीतून सावरण्यासाठी तेंडुलकरची मदत घेण्याचा निर्णय घेतला. तेंडुलकरनेही 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि 22 वर्ष त्याने देशाचे प्रतिनिधित्व केले. त्यामुळे पृथ्वीसाठी त्याचा सल्ला खूप फायद्याचा ठरू शकतो.

भारताच्या सध्याच्या संघातील खेळाडू निवृत्त झाल्यानंतर नेतृत्वाची धुरा सांभाळण्याची क्षमता पृथ्वीत आहे. त्यात त्याला तेंडुलकरचे मार्गदर्शन मिळणे सुखकारक समजले जात आहे. तेंडुलकरने याबाबत प्रतिक्रीया देण्यास नकार दिला. सूत्रांच्या माहितीनुसार,''वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी संघातील पदार्पणातच पृथ्वीनं शतक ठोकलं आणि सध्या तो बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमीत आहे. त्याने फलंदाजीचा सराव सुरू केला आहे. भारतीय संघ पुढील सहा महिने कसोटी सामने खेळणार नाही. त्यामुळे पृथ्वीकडे दुखापतीतून सावरण्यासाठी बराच वेळ आहे. तो तंदुरुस्त होऊन कमबॅक करेल.'' 

दुखापतीमुळे पृथ्वीचे इंडियन प्रीमिअर लीगमध्येही खेळण्याची शक्यता कमी आहे, परंतु त्याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. आयपीएलमध्ये तो दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करतो.

टॅग्स :पृथ्वी शॉसचिन तेंडुलकरआयपीएल