Join us  

प्रतिस्पर्धी फलंदाजांचा व्हिडिओ पाहून करतो तयारी; राशिद खानने सांगितले यशाचे रहस्य 

आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वात खेळण्याची इच्छा राशिद खानने व्यक्त केली आहे. काही महिन्याआधी धोनीने राशिद खानसोबत चर्चा केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 5:57 AM

Open in App

कराची : ‘प्रत्येक सामन्याआधी मी प्रतिस्पर्धी फलंदाजांचा पूर्ण अभ्यास करतो. त्यांच्या फलंदाजीचे व्हिडिओ पाहून मी त्यादृष्टीने माझ्या योजना आखतो,’ असे सांगत अफगाणिस्तानचा हुकमी फिरकीपटू राशिद खान याने आपल्या यशाचे रहस्य सांगितले.

एका यूट्युब चॅनेलवर राशिद म्हणाला, ‘ज्या फलंदाजांना गोलंदाजी करायची असते, त्या सर्वांच्या फलंदाजीचे व्हिडिओ मी पाहतो. यामुळे प्रत्येक फलंदाजाच्या कमजोर बाजू मला कळतात.’ या वेळी राशिदने आघाडीच्या फलंदाजांविरुद्ध कशा प्रकारे तयारी करतो हेही सांगितले. राशिद म्हणाला, ‘पाकिस्तानचा बाबर आझम जागतिक स्तराचा फलंदाज आहे. पण, मी माझ्या ताकदीनुसार गोलंदाजी करतो. त्यामुळेच मी फलंदाजांच्या व्हिडिओचा अभ्यास करतो. बाबर, विराट कोहली आणि केन विलियम्सन यांच्यापैकी कोण सर्वोत्तम आहे हे सांगणे कठीण आहे. कारण तिघेही शानदार फलंदाज आहेत. त्यांना आपला खेळ माहीत आहे.’राशिदने आयपीएल आणि पीएसएलची तुलना करण्यास नकारही दिला. तो म्हणाला की, ‘मी पीएसएलमध्ये आतापर्यंत केवळ तीनच सामने खेळलो आहे आणि आयपीएलमध्ये मी गेल्या पाच वर्षांपासून खेळत आहे. पीएसएलमध्ये वेगवेगळ्या मैदानांवर आणि प्रेक्षकांसमोर खेळल्यानंतरच मी ही तुलना करू शकेन.’

धोनीच्या एका सल्ल्याने बदलले राशिदचे आयुष्य!

आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वात खेळण्याची इच्छा राशिद खानने व्यक्त केली आहे. काही महिन्याआधी  धोनीने राशिद खानसोबत चर्चा केली होती. त्यावेळी त्याला खास सल्लादेखील दिला. राशिद म्हणाला, ‘धोनीने मला सांगितले की, ‘क्षेत्ररक्षणाच्या वेळी तू थोडी काळजी घे. तू डाईव्ह मारतोस. जेव्हा गरज नसते तेव्हा अशा पद्धतीने गोलंदाजी करू नकोस. एकच राशिद खान आहे आणि लोक त्याला खेळताना पाहू इच्छितात. त्यामुळे खेळताना दुखापत झाली तर काय होईल? मी जडेजालादेखील अशाच पद्धतीने  समजावले  होते.’ धोनीने दिलेला सल्ला माझ्या वाटचालीत फार मोलाचा ठरला.’