Join us

विश्वचषकासाठी भारताच्या संघ बांधणीची तयारी

एकदिवसीय सामना : ऑसीविरुद्ध पहिल्या लढतीसाठी ‘विराट सेना’ सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 06:08 IST

Open in App

हैदराबाद : ऑस्ट्रेलियाविरुद्ध शनिवारपासून सुरू होत असलेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला असून या मालिकेद्वारे विश्वचषकासाठी संघबांधणीची तयारीही होणार आहे.

टीम इंडिया हळूहळू विश्वचषकाची तयारी करीत असून नुकताच गमविलेल्या टी२० मालिकेचा आमच्या तयारीवर कुठलाही परिणाम होणार नसल्याचे कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे मत आहे. ‘विश्वचषकाआधी सर्वोत्तम खेळाडू तयार करायचे असल्याने आम्ही प्रयोग सुरू ठेवू, तथापि प्रत्येक सामना जिंकायचा आहे,’ असे कोहलीने सांगितले.

पाच सामन्यात किमान चार खेळाडूंची कामगिरी न्याहाळली जाईल. त्यात लोकेश राहुल, ऋषभ पंत, विजय शंकर आणि सिद्धार्थ कौल यांचा समावेश असून विश्वचषकासाठी जाणाऱ्या १५ सदस्यांच्या संघात दोन रिक्त जागांवर यांच्यापैकी कुणाची तरी वर्णी लावण्यात येईल. अनेकांच्या मते दिनेश कार्तिक याला देखील संधी मिळण्याची शक्यता आहे. या सर्व खेळाडूंसाठी पाचही सामने ‘परीक्षे’सारखेच असणार आहेत. राहुलने दोन्ही टी२० सामन्यात धावा काढल्या असल्यामुळे त्याला वरच्या स्थानावर फलंदाजीत स्थान मिळू शकते. राहुलला सलामीला खेळायची इच्छा असल्याने त्याला शिखर धवनच्या फॉर्मशी चढाओढ करावी लागेल. ऋषभ पंत एकदिवसीय सामन्यांत सतत अपयशी ठरत असल्याने व्यवस्थापन त्याच्याबाबत काय निर्णय घेईल, याकडेही लक्ष लागले आहे. विजय शंकरचा मारा तितकासा भेदक नाही. हार्दिक पांड्याच्या फिटनेस समस्येमुळे तो संघात खेळला. त्याचवेळी, पांड्या मात्र पहिली पसंती आहे.

दुसरीकडे, खलील अहमद पसंतीस न उतरल्यामुळे कौल हा राखीव वेगवान गोलंदाज म्हणून संघात राहू शकतो. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे हुकमी गोलंदाज प्रथम पसंती आहेत. त्याचवेळी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार विजय नेहमी हिताचा असल्याने ‘कोअर टीम’मध्ये फार बदल करण्याची कोहलीची इच्छा नाही.

अंबाती रायुडू, केदार जाधव हे देखील एकदिवसीय सामन्यांत उपयुक्त खेळाडू आहे. कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांच्यासोबत जाधव अप्रतिम मारा करू शकतो. जाधवचा मारा खेळण्यास प्रतिस्पर्धी ग्लेन मॅक्सवेल, डॉर्सी शॅर्ट, मार्कस स्टॉइनिस आणि शॉन मार्श यांना अडचण होऊ शकते. बुमराहला नंतरच्या एक किंवा दोन सामन्यात विश्रांती देण्याचाही विचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.अ‍ॅरोन फिंचच्या नेतृत्वाखालील पाहुण्या ऑस्टे्रलिया संघात अनुभवी फिरकीपटू नॅथन लियॉन दाखल झाला. तसेच, जखमी केन रिचर्डसनऐवजी अ‍ॅन्ड्र्यू टायला आॅसी स्थान देण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया