मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यान आगामी मालिका चुरशीची होईल, अशी अपेक्षा दक्षिण आफ्रिकेत जन्मलेले श्रीलंकेचे मुख्य प्रशिक्षक निक पोथास यांनी व्यक्त केली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने यजमान संघाच्या भेदक माºयाला यशस्वीपणे सामोरे जाणे आवश्यक असल्याचे पोथास यांनी सांगितले.
पोथास म्हणाले,‘भारतीय संघात कुठल्याही स्थितीत खेळणारे खेळाडू आहेत. हिरवळ असलेल्या खेळपट्टीवर गोलंदाजी करण्याची क्षमता असलेले गोलंदाज संघात आहेत. पाटा खेळपट्टीवर अचूक मारा करण्यात वाक् बगार गोलंदाज भारतीय संघात असून फिरकीपटूंना अनुकूल खेळपट्टीसाठी चांगले फिरकीपटूही संघात आहेत. भारतीय फलंदाज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धावा फटकावण्यात यशस्वी ठरले तर लढत चुरशीची होईल.’
पोथास पुढे म्हणाले,‘वन-डे क्रिकेटमध्ये भारतीय संघ दमदार आहे. तिसºया टी-२० मध्ये त्यांनी संघात अनेक बदल केले, पण त्यामुळे त्यांचे काहीच नुकसान झाले नाही. एम.एस. धोनी प्रदीर्घ कालावधीपासून फिनिशरची भूमिका बजावत असून तो यात जगात सर्वोत्तम आहे. या लढतीत हार्दिकलाही संधी मिळाली. भारत भविष्यासाठी सिनिअर खेळाडूंचे स्थान घेणारे खेळाडू तयार करीत आहे.’ कुलदीप यादव व यजुवेंद्र चहल यांच्यासारखे भारतीय फिरकीपटू दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांपुढे कडवे आव्हान उभे करू शकतात, असेही पोथास यांनी यावेळी सांगितले. (वृत्तसंस्था)