Join us  

पूजा, स्मृतीने गाजविला पहिला दिवस

महिला कसोटी : ऑस्ट्रेलिया सर्वबाद २१९, भारत १ बाद ९८ धावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 5:56 AM

Open in App

मुंबई : वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध गुरुवारी सुरू झालेल्या एकमेव महिला कसोटीचा पहिला दिवस २४ वर्षांची मध्यम वेगवान गोलंदाज पूजा वस्त्राकर आणि २७ वर्षांची सलामीची फलंदाज स्मृती मानधना यांनी गाजवल्याने भारताचे पारडे जड झाले. पूजाने ५३ धावांत ४ बळी घेत ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात २१९ धावांत रोखले. प्रत्युत्तरात भारताने दिवसअखेर १ बाद ९८ अशी वाटचाल केली. भारतीय संघ १२१ धावांनी मागे असून, खेळ थांबला त्यावेळी स्मृती ४३ धावांवर नाबाद होती. त्याआधी शेफाली वर्मा ४० धावा काढून बाद झाली.

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने फलंदाजीचा निर्णय घेतला. पूजाने चार तर स्नेह राणाने ३ आणि दीप्ती शर्माने २ बळी घेत पाहुण्या संघाला मोठ्या खेळीपासून रोखले. भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाची पहिल्या डावात ही सर्वांत कमी धावसंख्या ठरली. त्यांची सुरुवात खराब झाली. सलामीची फोबे लिचफिल्ड भोपळा न फोडता धावबाद झाली. बेथ मूनीने ४० तर तहलिया मॅक्ग्राने ५० धावांचे योगदान दिले.

मधल्या फळीत कर्णधार एलिसा हिलीच्या ३८ धावांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज अपयशी ठरल्या. ॲनाबेल, सदरलॅन्ड १६ आणि ॲश्लेघ गार्डनर ११, जेस जोनासन १९ यांना चांगल्या सुरुवातीचे रूपांतर मोठ्या खेळीत करता आले नाही. तळाच्या स्थानावरील किम गर्थने संयमी नाबाद २८ धावांची खेळी करीत संघाला २०० चा टप्पा गाठून दिला. भारताकडून रिचा घोष हिने कसोटी पदार्पण केले. उभय संघांत आतापर्यंत १० कसोटी सामने खेळले गेले. ऑस्ट्रेलियाने चार सामने जिंकले असून, सहा कसोटी अनिर्णीत राहिल्या. भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत कसोटी विजय मिळालेला नाही.

संक्षिप्त धावफलकऑस्ट्रेलिया :  ७७.४ षटकांत सर्वबाद २१९ (बेथ मुनी ४०, तहलिया मॅक्ग्रा ५०,  एलिसा हिली ३८, ॲनाबेल सदरलॅन्ड १६, जेस जोनासेन १९, किम गार्थ नाबाद २८) गोलंदाजी : पूजा वस्त्राकर १६-२-५३-४, स्नेह राणा २२.४-४-५६-३,  दीप्ती शर्मा १९-३-४५-२. भारत : १९ षटकांत १ बाद ९८ (शेफाली वर्मा ४०, स्मृती मानधना खेळत आहे ४३, स्नेह राणा खेळत आहे ४) गोलंदाजी : जेस जोनासन ४-१.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया