कोलंबो : बांगलादेशच्या खेळाडूंनी शुक्रवारी केलेल्या असभ्य वर्तनाबद्दल क्रिकेट श्रीलंकेने (एसएलसी) सडकून टीका केली असून खेळाडूंचे हे वर्तन लाजिरवाणे तसेच कीव येणारे असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे शाकिब अल हसन आणि नुरुल हसन या खेळाडूंना आयसीसी आचारसंहितेत दोषी धरून सामना शुल्काच्या २५ टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला. दोघांच्या खात्यात ‘एक डिमेरिट गुण’
जमा झाला आहे.
टी-२० सामन्यात बांगलादेशची फलंदाजी सुरूअसताना शेवटच्या षटकात दोन्ही संघांत राडा झाला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. पंचांना मध्यस्थीही करावी लागली. अखेरच्या षटकात पंचाच्या निर्णयावर नाराज कर्णधार शाकिब अल हसन सीमारेषेवर पोहोचला. त्याने आपल्या फलंदाजांना परत येण्याचा इशारा दिला.
घडलेल्या प्रसंगाबद्दल खेद व्यक्त करीत एसएलसीप्रमुख थिलंगा सुमतीपाला म्हणाले, ‘पंचाच्या निर्णयाविरुद्ध अशी उद्धट प्रतिक्रिया खेळात मान्य नाही. हा प्रकार खेदजनक आहे.’
नेमके काय घडले?
बांगलादेशला विजयासाठी धावांची गरज होती. मुस्ताफिजूर रहमान शेवटच्या षटकात दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. यावरून दोन्ही संघात वादावादी सुरू झाली. २० व्या षटकाचा पहिला चेंडू बाऊन्सर होता पण तो ‘वाईड’ दिला गेला नाही. दुसरा चेंडू जास्त उसळी घेणारा होता. या चेंडूवर धाव घेण्याच्या नादात मुस्ताफिजूर रहमान बाद झाला. यानंतर लगेचच वादाला तोंड फुटले. पंचांनी मध्यस्थी करीत वाद थांबविला. त्यानंतर कर्णधार शाकीब अल हसनने महमुदुल्लाह आणि रुबल हसन या दोघांनाही मैदान सोडण्यासाठी खुणावले. तथापि पंचांचा हस्तक्षेप तसेच श्रीलंकेच्या खेळाडूंनी केलेल्या मनधरणीनंतर खेळ सुरू झाला. बांगलादेशच्या संघाला विजयासाठी ४ चेंडूंत १२ धावांची गरज होती. महमुदुल्लाने तिसºया चेंडूवर चौकार मारला. पुढच्या चेंडूवर दोन धावा निघाल्या. शेवटच्या दोन चेंडूत बांगलादेशला विजयासाठी सहा धावांची गरज होती. पाचव्या चेंडूवर महमुदुल्लाहने षटकार ठोकताच बांगलादेश विजयी झाला. मात्र बाचाबाचीमुळे सामन्याला गालबोट लागले. एका वृत्तानुसार बांगला देशच्या खेळाडूंनी विजयाचा आनंद साजरा करताना ड्रेसिंग रूममधील काचा फोडल्या.
बांगलादेशच्या संघ व्यवस्थापनाने या आरोपावर मौन पाळले आहे, तथापि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची तयारी पाहुण्या संघाने दर्शविली आहे. आयसीसी मॅच रेफ्री ख्रिस ब्रॉड यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही खेळाडूंनी स्वत:ची चूक मान्य केल्याचे कळते. दोन्ही खेळाडूंचे वर्तन माफ करण्यासारखे नव्हते, असे ब्रॉड यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
मला शांत राहण्याची गरज : शाकिब
बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन याने घडलेल्या प्रकराबद्दल खेद व्यक्त करीत मला शांत राहण्याची आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना शाकिब म्हणाला, ‘मी सहकाºयांना परत बोलवित नव्हतो तर खेळत राहण्याचा इशारा करीत होतो. तुम्ही माझा इशारा कशा प्रकारे घेता, यावर अवलंबून आहे. मला शांत राहायला हवे होते. पुढे असा प्रकार होऊ नये, याबद्दल भावनांवर नियंत्रण ठेवण्याची मी खबरदारी घेईन.’