दुबई: इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन हा सध्या येथे सुरू असलेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये क्वेटा ग्लाडिएटर्सचे प्रतिनिधित्व करीत आहे. पीटरसनने पाकमध्ये खेळण्यास चक्क नकार दिला.
बुधवारी झालेल्या सामन्यात त्याच्या कामगिरीच्या बळावर क्वेटा संघाने इस्लामाबाद युनायटेडला हरविले. या संघाचे नेतृत्व मिस्बाह उल हक करीत आहे. केविन पीटरसनने ३४ चेंडूंवर ४८ धावा ठोकून या मोसमात संघाला दुसरा विजय मिळवून दिला. अशावेळी त्याने केलेले वक्तव्य ग्लाडिएटर्ससाठी धोक्याची सूचना आहे.
सामना संपल्यानंतर एका पत्रकाराने पीटरसनला विचारले, तुझा संघ फायनलमध्ये पोहोचल्यास तू पाकमध्ये जाणार का, यावर केविन पीटरसनने क्षणार्धात ‘नाही’, असे उत्तर दिले.
पाकमध्ये जाण्यास अडचण...
२००९ मध्ये श्रीलंका संघ पाक दौºयावर आला होता. तेथे दहशतवादी हल्ला झाला. तेव्हापासून अनेक संघ आणि खेळाडू पाकमध्ये जाणे टाळताना दिसतात. याच कारणास्तव पाक सुपर लीगचे अनेक सामने यूएई आणि दुबईत होत आहेत. अंतिम सामन्यासह मोजके सामने पाकमध्ये होतील.
(वृत्तसंस्था)
>पीएसएलच्या सामन्यांना प्रेक्षकच नाही
दुबई : पाकिस्तान सुपर लीगच्या सामन्यांना प्रेक्षक गर्दीच करत नसल्याचे दिसून येत आहे. प्रेक्षकांच्या उत्साहाशिवाय पीएसएलचे टी-२० सामने होत आहेत. दुबईतील प्रेक्षकांमध्ये पाकिस्तान सुपर लीगचे आयोजक या लीगबद्दल रुची निर्माण करण्यात अपयशी ठरले आहेत. लीगच्या तिसºया सत्राला गेल्या आठवड्यात युएईत सुरुवात करण्यात आली. मात्र पाकिस्तानच्या आघाडीच्या क्रिकेटरांशिवाय अन्य देशातील काही प्रमुख खेळाडूदेखील या लीगमध्ये खेळत आहे. तरीही प्रेक्षक सामने बघण्यासाठी येत नाहीत. उद््घाटन सोहळ्यात अली सफर, अबिदा परवीन यासारखे पाकिस्तानी कलाकार आणि अमेरिकन रॅपर जेसन डेरुलो देखील उपस्थित होते. तरीही प्रेक्षकांनी या लीगकडे पाठ फिरवली आहे. ही स्पर्धा पाकिस्तानात खेळवण्यासाठी आयोजक प्रयत्नशील आहेत.
मात्र २००९ मध्ये श्रीलंकन संघावर झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर देशात कोणताही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना झालेला नाही. गेल्या वर्षी पीएसएलचा अंतिम सामना लाहोरमध्ये खेळवण्यात आला होता. त्यानंतर विश्व एकादशने देखील तीन टी२० सामने लाहोर आणि कराचीत खेळले होते.