Join us  

पांड्याचे झंझावाती शतक! पहिल्या डावात भारताच्या 487 धावा

कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक फटकावणाऱ्या  हार्दिक पांड्याने केलेली तुफानी फटकेबाजी आणि त्याला तळाच्या फलंदाजांनी चिवट खेळ करत दिलेल्या उत्तम साथीमुळे भारताने पल्लेकल कसोटीच्या पहिल्या डावात साडेचारशे पार मजल मारली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2017 12:39 PM

Open in App

पल्लेकल, दि. 13 - कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक फटकावणाऱ्या  हार्दिक पांड्याने केलेली तुफानी फटकेबाजी आणि त्याला तळाच्या फलंदाजांनी चिवट खेळ करत दिलेल्या उत्तम साथीमुळे भारताने पल्लेकल कसोटीच्या पहिल्या डावात साडेचारशे पार मजल मारली. हार्दिक पांड्याने  96 चेंडूत फटकावलेल्या 108 धावा हे भारतीय संघाच्या आजच्या खेळाचे वैशिष्ट्य ठरले. दरम्यान त्याने एका षटकात 26 धावा कुटत कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून एका षटकात सर्वाधिक धावा फटकावण्याचा विक्रमही आपल्या नावे केला.  त्यानंतर यजमान श्रीलंकेच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. त्यांचे चार फलंदाज चहापानापूर्वीच माघारी परतले. भारतीय संघाने आज खेळायला सुरुवात केल्यावर वृद्धिमान साहा आणि हार्दिक पांड्याने संयमी सुरुवात केली. मात्र सावध खेळत असलेला साहा 16 धावा काढून बाद झाला. त्यानंतर पांड्याने कुलदीप यादवसोबत (26)  61 धावांची भागीदारी करत संघाला चारशेपार मजल मारून दिली. कुलदीप बाद झाल्यावर पांड्याने आपल्या फलंदाजीचा गिअर बदलला. यादरम्यान, त्याने मालिंदा पुष्पकुमाराच्या एका षटकात तीन षटकार आणि दोन चौकारांसह 26 धावा वसूल केल्या. पांड्याने त्यानंतरही लंकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू ठेवत अवघ्या 86 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.   कालच्या 6 बाद 329 धावांवरून पुढे खेळणाऱ्या भारतीय संघाने आज उपाहारापर्यंतच्या खेळात आपल्या धावसंख्येत 158 धावांची भर घातली.  उपाहाराला खेळ थांबला तेव्हा भारताच्या 9 बाद 487 धावा झाल्या होत्या. मात्र उपाहारानंतर भारताचा डाव लांबला नाही. पांड्याला 108 धावांवर बाद करत लक्षण सँडकनने भारताचा डाव 487 धावांवर संपु्ष्टात आणला. सँडकनने पाच बळी टिपले. तत्पूर्वी सामन्याच्या पहिल्या दिवशी  सलामीवीर फलंदाज शिखर धवनचे सहावे कसोटी शतक आणि त्याने लोकेश राहुलसोबत सलामीला केलेल्या १८८ धावांच्या भागीदारीनंतर भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे यजमान श्रीलंकेने भारताला पहिल्या दिवसअखेर ६ बाद ३२९ धावांत रोखले.