Join us  

पांडुरंग साळगावकर ६ महिन्यांसाठी निलंबित, मात्र खेळपट्टीचे तपशील बुकींना पुरविल्याचा आरोप सिद्ध नाही

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या खेळपट्टीचे क्युरेटर असलेले पांडुरंग साळगावकर यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ६ महिन्यांसाठी निलंबित केले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 1:16 AM

Open in App

पुणे  - महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या खेळपट्टीचे क्युरेटर असलेले पांडुरंग साळगावकर यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ६ महिन्यांसाठी निलंबित केले आहे.२५ आॅक्टोबर २०१७ या दिवशी भारत-न्यूझीलंड यांच्यातील डे-नाईट एकदिवसीय लढतीपूर्वी साळगावकर यांनी गहुंजे स्टेडियमच्या खेळपट्टीची माहिती बुकींना विकल्याचा आरोप एका न्यूज चॅनलने केला होता. मात्र, आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने केलेल्या चौकशीत हा आरोप सिद्ध झाला नाही. मात्र, अनोळखी व्यक्तीला खेळपट्टीची माहिती दिल्याप्रकरणी दोषी ठरवून आयसीसीच्या २.४.४ या कलामान्वये मंगळवारी साळगावकर यांच्यावर ६ महिन्याच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली.मागील वर्षी २५ आॅक्टोबरला एका चॅनलने हा आरोप करताच मोठी खळबळ उडाली. एमसीएचे अध्यक्ष अभय आपटे यांनी याप्रकरणी कारवाई करीत त्याच दिवशी साळगावकर यांना निलंबित केले होते. मात्र, या घटनेला ४ महिने लोटूनदेखील आयसीसीने काहीच कारवाई केलेली नव्हती. अखेर मंगळवारी आयसीसीने साळगावकर यांच्यावरील आरोप तथ्यहीन ठरविले. मात्र, आयसीसीच्या नियमांचा भंग केल्याप्रकराणी त्यांना ६ महिने निलंबित केले. यापैकी ४ महिन्यांचा कालावधी संपला आहे.महाराष्ट्राचे माजी वेगवान गोलंदाज असलेल्या साळगावकर यांनी आपली चूक मान्य केली आहे. त्यांच्यावरील ६ महिन्यांच्या निलंबनाचा कालावधी येत्या २४ एप्रिलला संपणार आहे. ‘‘आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी केली. यात साळगावकर यांच्यावर करण्यात आलेले आरोप सिद्ध होऊ शकले नाही. मात्र, आयसीसीच्या नियमांचे पालन न केल्यामुळे त्यांच्यावर आम्ही ६ महिने निलंबनाची कारवाई करीत आहोत,’’ अशी माहिती आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाचे महाव्यवस्थापक अ‍ॅलेक्स मार्शल यांनी दिली. 

टॅग्स :क्रिकेटपांडुरंग साळगावकरआयसीसीबीसीसीआय