त्यानं ‘तिला’ जाहीर विचारलं, हिल्स घालून कुणी क्रिकेट पीचवर येतं का?; अन्...

मरीना एकेकाळी पाकिस्तानची क्रिकेटपटू होती. २०१७ म्हणजे अलीकडेच तिने निवृत्ती घेतली. सहा वर्षे तिने पाकिस्तानी संघात आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 04:25 AM2020-10-09T04:25:43+5:302020-10-09T06:55:41+5:30

whatsapp join usJoin us
Pakistans first woman commentator shuts down troll over high heels | त्यानं ‘तिला’ जाहीर विचारलं, हिल्स घालून कुणी क्रिकेट पीचवर येतं का?; अन्...

त्यानं ‘तिला’ जाहीर विचारलं, हिल्स घालून कुणी क्रिकेट पीचवर येतं का?; अन्...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मरीना इकबाल. हे नाव तसं क्रिकेटच्या जगात फार ओळखीचंही नाही. लोकप्रियही नाही. पण परवाच्या मंगळवारी एकाएकी तिचं नाव ट्विटरला ट्रेण्ड होऊ लागलं. हॅशटॅग ट्रेण्डिंग झाला आणि मग अनेकांनी शोधून पाहिलं की कोण ही मरीना इकबाल?

तर मरीना एकेकाळी पाकिस्तानची क्रिकेटपटू होती. २०१७ म्हणजे अलीकडेच तिने निवृत्ती घेतली. सहा वर्षे तिने पाकिस्तानी संघात आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलं. ३६ एकदिवस सामने आणि ४२ टी-ट्वेण्टी सामने खेळून तिनं निवृत्ती जाहीर केली. मात्र २००९ ते २०१७ या कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अशीच तिची ओळख होती. विशेष म्हणजे निवृत्तीनंतर तिचं कॉमेण्ट्री बॉक्समध्ये पदार्पण झालं. विशेष यासाठी की ती पाकिस्तानातली पहिला महिला कॉमेण्टेटर. पुरुषांच्या क्रिकेट खेळात महिलेनं समालोचन करणं, टीकाटिप्पणी करणं हे कॉमेण्ट्री बॉक्सलाही जिथं फार रुचणारं नव्हतं तिथं मरीनाने एक उत्तम कॉमेण्टेटर म्हणून आपली ओळख निर्माण केली.

पण पुरुषी खेळ म्हणून ओळख असलेल्या क्रिकेटमध्ये, विशेषत: भारतीय उपखंडातल्या सर्वच देशात महिलांना क्रिकेट कळतं हे अजूनही रुचलेलं नाही, मान्य नाही. वरकरणी महिला क्रिकेटला प्रोत्साहन दिलं जात असलं तरी ‘ते म्हणजे बायकांची भातुकली, त्यांना काय क्रिकेटचा रांगडा खेळ जमतो का?’ असाच एकूण अ‍ॅटिट्यूड. आणि त्याच छुप्या अ‍ॅटिट्यूडचं दर्शन अधनमधनं होत असतंच. तेच मरीनाच्याही संदर्भात झालं.

पाकिस्तानात सध्या राष्ट्रीय पातळीवरची पाकिस्तान राष्ट्रीय टी ट्वेण्टी टुर्नामेण्ट सुरूआहे. मुलतान आणि रावळपिंडी या दोन शहरांत हे सामने होतात. त्यासाठी समालोचक म्हणून मरीना काम करते.

तर झालं असं की कादीर ख्वाजा नावाच्या क्रीडा पत्रकाराने मंगळवारी एक ट्विट केलं, उर्दूमध्ये. सोबत मरीनाचे फोटोही होते. त्यात त्यानं लिहिलं की, क्रिकेटच्या पीचवर हिल्स घालून फिरणं अधिकृत आहे का? चालतं का असं वागलं तर?

त्या ट्विटची बरीच चर्चा झाली. मात्र मरीनाने त्यावर उत्तर म्हणून ट्विट करत सांगितलं की, ‘अर्धवट माहिती धोकादायक असते. मी पीचजवळ गेले तेव्हा सपाट चपलाच घालून गेले होते, प्री मॅच चर्चा सुरूअसताना मात्र हिल्स घातले होते. मी पाकिस्तानची माजी खेळाडू आहे, मला क्रिकेटचे प्रोटोकॉल्स कळतात!’ - या ट्विटची, मरीनाच्या सडेतोड स्पष्टवक्तेपणाची बरीच चर्चा झाली आणि अनेकांनी विचारलंही जाहीरपणे की ही कोणती वृत्ती?



आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या एखाद्या पुरुष खेळाडूला अशा पद्धतीने अपमानास्पद प्रश्न विचारले गेले असते का? ‘बाई आहे, हिल्स घालते म्हणजे तिला क्रिकेटच्या पीचवर ते घालून जाऊ नये हे समजण्याची अक्कलच नसणार असं परस्पर का गृहीत धरण्यात आलं?’- असा पाकिस्तानी नेटिझन्सनी बराच खल केला. आपल्या देशात कितीही महिला सबलीकरणाचे नारे लगावले जात असतील तरी प्रत्यक्षात मानसिकता बदल शून्य आहे असं स्पष्ट मतही अनेकांनी नोंदवलंच.

पाकिस्तानात जेव्हा महिला क्रिकेटची सुरुवात होत होती, त्या काळात खेळाडू म्हणून पुढे आलेली मरीना. तिचे वडील सैन्यात होते. ते स्वत:ही टेनिस खेळत. आपल्या मुलीनंही मुलांसारखे मैदानी खेळ खेळावेत म्हणून त्यांनीच लेकीला खेळायला प्रोत्साहन दिलं.

त्यांची इच्छा होती की, तिनंही टेनिस खेळावं. पण मरीनाला क्रिकेट आवडायचं. भावांसह ती क्रिकेट खेळायची. मात्र त्या काळात मुलीनं असं मुलांसोबत खेळणं स्थानिकांना रुचण्यासारखं नव्हतं.

ते आर्मीत असल्यानं जरा तरी वातावरण खेळाला पोषक होतं. मुलींच्या क्रिकेटसाठी क्लब, मार्गदर्शन काहीच नसण्याचा तो काळ होता. पुढे कॉलेजात जायला लागल्यावर तिथल्या संघात तिची निवड झाली.

त्याच काळात पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं महिला क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय स्तरावरही उतरवण्याचं ठरवलं आणि त्या संघात मरीनाची निवड झाली. फार मोठी कामगिरी ती आंतरराष्ट्रीय मैदानावर करू शकली नाही. मात्र क्रिकेट तिचं पॅशन होतंच, त्यातून कॉमेण्टेटर म्हणूनही ती आता एक नवी वाट चालते आहे.

Web Title: Pakistans first woman commentator shuts down troll over high heels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.