Join us  

द. आफ्रिकेविरुद्ध पाकिस्तानची पहिल्याच दिवशी घसरगुंडी;  ३३ धावांत ४ फलंदाज गमावले

पहिली कसोटी: द. आफ्रिकेला २२० धावांवर रोखलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 11:57 PM

Open in App

कराची : कागिसो रबाडा आणि केशव महाराज यांनी पाकिस्तानच्या आघाडीच्या फळीची दाणादाण उडविताच द. आफ्रिकेने मंगळवारी येथील नॅशनल स्टेडियमवर सुरू झालेल्या पहिल्या कसोटीत पहिल्याच दिवशी पकड मिळविली आहे. द. आफ्रिका संघ पहिल्या डावात केवळ २२० पर्यंत मजल गाठू शकला. पाकिस्तानदेखील पहिल्या दिवसअखेर ३३ धावात चार गडी गमावून संघर्ष करीत होता. यजमान संघ पाहुण्यांच्या तुलनेत अद्यापही १८७ धावांनी मागे आहे. रबाडाने आठ धावात दोघांना बाद केले. आबिद अलीची दांडी गुल केल्यानंतर पहिली कसोटी खेळणारा इम्रान बट्ट (९) याला गलीमध्ये झेल देण्यास भाग पाडले. केशव महाराजने एकही धाव न देता अखेरच्या षटकात तिसऱ्या चेंडूवर कर्णधार बाबर आझमला पायचित केले. एन्रिच नॉर्खियाने नाईट वॉचमन शाहीन आफ्रिदीला त्रिफळाबाद करून पाकच्या संकटात भर टाकली. खेळ थांबला त्यावेळी अझहर अली आणि फवाद आलम प्रत्येकी ५-५ धावा काढून नाबाद होते.

पाकिस्तानात १३ वर्षानंतर कसोटी खेळत असलेल्या द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. पाहुण्यांनी संघात दोन फिरकीपटूंना स्थान दिले. पहिल्या सत्रात त्यांनी २ बाद ९४ अशी वाटचाल केली खरी मात्र त्यानंतर पाकचे फिरकी गोलंदाज वरचढ झालेले दिसले. लेग स्पिनर यासिर शाह याने ५४ धावात तीन तर पहिला सामना खेळणाऱ्या नौमान अली याने ३८ धावात दोन गडी बाद केले. वेगवान शाहीन आफ्रिदीने दोन बळी घेतले.

सलामीवीर डीन एल्गर याने द. आफ्रिकेकडून आश्वासक सुरुवात केली. त्याने सर्वाधिक ५८ धावा केल्या. जाॅर्ज लिंडे ३५, रबाडा नाबाद १ आणि एडेन मार्कराम १३, रॉसी दुसेन १७ हे मात्र मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. दुसऱ्या सत्रात ८५ धावा निघाल्या. कर्णधार क्विंटन डिकॉक १५ आणि तेम्बा बावुमा १७ हेदेखील लवकर बाद झाले. रबाडा आणि लुंगी एनगिडी यांनी २०० धावा फळ्यावर लावल्या. 

टॅग्स :पाकिस्तानद. आफ्रिका