Join us  

पाकचा बाबर आझम आशियातील 'फास्टर फेणे'; टीम इंडियाच्या कॅप्टन कोहलीचा विक्रम मोडला

पाकिस्तानमध्ये दहा वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय वन डे सामना खेळवण्यात आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 9:10 AM

Open in App

पाकिस्तानमध्ये दहा वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय वन डे सामना खेळवण्यात आला. पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तीन वन डे सामन्यांच्या मालिकेतील हा दुसरा सामना होता. त्यात पाकच्या बाबर आझमने शतकी खेळी करताना भारताचा कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडला. वन डे क्रिकेटमध्ये बाबरचे हे 11वे शतक ठरले आणि वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 11 शतक करणारा तो आशियातील अव्वल फलंदाज ठरला आहे.

फाखर जमान ( 54) आणि इमाम-उल-हक ( 31) यांनी चांगली सुरुवात करून दिल्यानंतर बाबरने जबरदस्त खेळ केला. त्यानं 105 चेंडूंत 8 चौकार व 4 षटकारांसह 115 धावा केल्या. पाकिस्तानमधील त्याचे हे पहिलेच शतक ठरले. हॅरिस सोहेल ( 40) आणि इफ्तिकार अहमद ( 32) यांनी तळात फटकेबाजी करताना पाकिस्तानला 50 षटकांत 7 बाद 305 धावांचा टप्पा गाठून दिला. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संपूर्ण संघ 238 धावांत माघारी परतला. श्रीलंकेच्या आघाडीच्या फलंदाजांना अपयश आल्यानंतर सेहाना जयसूर्या (96), दासून सनाका ( 68) आणि वनिंदू हसारंगा ( 30) यांनी शर्थीचे प्रयत्न केले. पाकिस्तानच्या उस्मान शिनवारीनं 51 धावांत 5 फलंदाज बाद केले.

या सामन्यात बाबरने विक्रमाला गवसणी घातली. वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 11 शतकं करण्याचा विक्रम बाबरने स्वतःच्या नावावर केला. त्यानं कोहलीला मागे टाकले. बाबरने 71 डावांत 11 शतकं झळकावली आहेत. कोहलीला हा पल्ला ओलांडण्यासाठी 82 डाव खेळावे लागले होते. या विक्रमात दक्षिण आफ्रिकेचे हाशिम आमला ( 64) आणि क्विंटन डी कॉक ( 65) अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत. 

टॅग्स :पाकिस्तानविराट कोहलीश्रीलंका