Join us  

T20 World Cup Pakistan Vs Scotland : पाकच्या मोहम्मद रिझवाननं कमालच केली, 'युनिव्हर्सल बॉस' ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडला

T20 World Cup Pakistan Vs Scotland : स्कॉटलंडविरोधातील सामन्यात मोहम्मद रिझवान हा १५ धावांवर बाद झाला असला तरी त्यानं एक जागतिक विक्रम आपल्या नावे केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2021 11:38 PM

Open in App

T20 World Cup Pakistan Vs Scotland : ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये तुफान फॉर्मात असलेल्या पाकिस्तानच्या संघानं विजयरथ कायम राखत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. पाकिस्ताननं स्कॉटलंड विरुद्धचा सामना ७२ धावांनी जिंकला. पाकिस्ताननं उभारलेल्या १९० धावांच्या आव्हानाला सामोरं जाताना स्कॉटलंडला २० षटकांच्या अखेरीस ६ बाद ११७ धावा करता आल्या. पाकिस्तानकडून शादाब खान यानं दोन विकेट्स मिळवल्या, तर शाहिन शाह आफ्रिदी, हारिस रौफ आणि हसन यांनी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. स्कॉटलंडकडून रिची बेरिंग्टन यानं सर्वाधिक नाबाद ५४ धावा केल्या. या सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) हा भलेही १५ धावांवर बाद झाला असेल तरी त्यानं एक जागतिक विक्रम आपल्या नावे केला आहे.

रिझवान हा टी २० क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर इयरमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदान बनला आहे. यापूर्वी हा विक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल (Chris Gayle) याच्या नावे होता. २०२१ मध्ये आतापर्यंत रिझवान यानं टी २० सामन्यात १६६६ धावा केल्या. ख्रिस गेलनं यापूर्वी २०१५ मध्ये १६६५ धावा करत हा विक्रम आपल्या नावे केला होता. विराट कोहलीनं (Virat Kohli) यापूर्वी २०१६ मध्ये एका कॅलेंडर इयरमध्ये १६६४ धावा केल्या होत्या.

मोहम्मद रिझवान यावर्षी टी २० इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक धावा ठोकणारा फलंदाजही ठरला आहे. रिझवानच्या उत्तम परफॉर्मन्समुळे पाकिस्तानी संघाला टी २० विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये प्रवेशाची संधी मिळाली आहे. भारताविरोधातील सामन्यात रिझवान आणि बाबरनं उत्तम फलंदाजी करत १५२ धावांची पार्टनरशिप केली होती. तसंच या सामन्यात भारताला १० विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला होता.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१पाकिस्तानख्रिस गेल
Open in App