Join us  

Pakistan vs Bangladesh: बांगलादेश दौऱ्यावर पोहोचलेल्या पाकच्या संघानं नेट्समध्ये लावला राष्ट्रध्वज, एकच खळबळ!

Pakistan vs Bangladesh: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागलेला पाकिस्तानचा संघ आता आपल्या पुढील मिशनसाठी बांगलादेशमध्ये दाखल झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 4:29 PM

Open in App

Pakistan vs Bangladesh: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागलेला पाकिस्तानचा संघ आता आपल्या पुढील मिशनसाठी बांगलादेशमध्ये दाखल झाला आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात १ नोव्हेंबरपासून ट्वेन्टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. पण या मालिकेला सुरुवात होण्याआधीच एक मोठा वाद निर्माण झाला आहे. 

पाकिस्तानी क्रिकेट संघानं बांगलादेशमध्ये सराव शिबिरावेळी पाकिस्तानचा राष्ट्रध्वज नेट्सजवळ उभारला होता. याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाले असून बांगलादेशच्या चाहत्यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. बांगलादेशच्या चाहत्यांनी याचा कठोर विरोध केला आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तानच्या संघानं ट्वेन्टी-२० वर्ल्डकपवेळी देखील असंच केलं होतं. पाकिस्तानचा संघ नेट्समध्ये सराव करताना नेट्स जवळच पाकिस्तानचा राष्ट्रध्वज उभारण्यात येऊ लागला आहे. यामागचं कारण अद्याप पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आलेलं नाही. 

पाकिस्तानचा संघ नेट्समध्ये सराव करतानाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होऊ लागले आहेत. दुसऱ्या देशात येऊन आपल्या देशाचा राष्ट्रध्वज असा जाणूनबुजून लावणं चुकीचं असल्याचं बांगलादेशच्या चाहत्यांचं म्हणणं आहे. पाकिस्तान संघानं याची दखल घेऊन माफी मागायला हवी अशीही मागणी केली जात आहे. बांगलादेशमध्ये आतापर्यंत अनेक संघ खेळण्यासाठी आले आहेत. पण कोणत्याही संघानं असं कृत्य आजवर केलेलं नाही. मग पाकिस्ताननं असं करण्यामागचं कारण काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

पाकिस्तानचा संघ बांगलादेश दौऱ्यात तीन ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहे. पहिला सामना १९ नोव्हेंब रोजी खेळवला जाणार आहे. दुसरा आणि तिसरा सामना चिटगावं येथे होणार आहे. ट्वेन्टी-२० मालिकेनंतर दोन कसोटी सामने देखील होणार आहे. पाकिस्ताननं नुकताच पार पडलेल्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत जबरदस्त कामगिरीची नोंद करत उपांत्य फेरी गाठली होती. सुपर-१२ मध्ये पाकिस्ताननं सर्व सामने जिंकून उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला होता. पण उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. 

टॅग्स :पाकिस्तानबांगलादेश
Open in App