Join us  

Abdul Razzaq : "भारतीयांपेक्षा पाक खेळाडूंमध्ये अधिक टॅलेंट; विराट-बाबरची तुलना शक्य नाही" 

Abdul Razzaq on indian cricket players: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अब्दुल रझाक यानं भारतीय क्रिकेट खेळाडूंबाबत वादग्रस्त विधान केलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 5:38 PM

Open in App

India vs Pakistan, Abdul Razzaq : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अब्दुल रझाक (Abdul Razzaq) यानं भारतीय क्रिकेट खेळाडूंबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट खेळाडूंची भारतीय खेळाडूंसोबत तुलना करता येणार नाही. कारण पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये अधिक टॅलेंट आहे, असं रझाकनं म्हटलं आहे. (Razzaq wants India to play Pakistan before critics compare Kohli and Babar)

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि पाकिस्तानचा आघाडीचा फलंदाज बाबर आझम (Babar Azam) यांची तुलना होऊ शकत नाही. दोघंही वेगवेगळे खेळाडू आहेत, असंही रझाक म्हणाला. 

"विराट आणि बाबरची एकमेकांशी तुलना होऊ शकत नाही. तुम्ही पाकिस्तानच्या खेळाडूंची भारतीय खेळाडूंशी तुलना करू शकत नाही. कारण पाकिस्तानचे खेळाडू अधिक टॅलेंटेड आहेत. आपण जर इतिहासात डोकावून पाहिलं तर मोहम्मद युसूफ, इंझमाम उल हक, सईद अन्वर, जावेद मियाँदाद, झहीर अब्बास आणि एझाज अहमद यांच्यासारखे महान खेळाडू पाकिस्ताननं दिले आहेत", असं अब्दुल रझाक म्हणाला. तुलना करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सामने व्हावेत

"विराट आणि बाबर आझमची तुलना करणं योग्य नाही. तुम्हाला जर दोघांची तुलना करायचीच असेल तर दोन्ही देशांमध्ये सामने व्हायला हवेत. त्यानंतरच दोघांमध्ये कोण सरस आहे याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता", असं रझाक म्हणाला. विराट कोहली नक्कीच चांगला खेळाडू आहे आणि त्यानं पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी देखील केली आहे. मी त्याच्या विरोधात नाही. पण भारतीय त्यांच्या खेळाडूंची पाकिस्तानच्या खेळाडूंशी तुलना करत नसतील तर आपणही तशी तुलना करू नये, असंही रझाक यावेळी म्हणाला. 

भारतीय कसोटी संघानं नुकतंच इंग्लंडविरुद्धची मालिका जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या विजयासह भारतीय कसोटी संघ क्रमावरीत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. तर पाकिस्तानचा संघ पाचव्या स्थानावर आहे. एकदिवसीय आणि टी-२० क्रमवारीतही भारतीय संघ पाकिस्तानपेक्षा पुढे आहे. एकदिवसीय आणि टी-२० मध्ये भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे. तर पाकिस्तानचा संघ एकदिवसीय क्रमवारीत सहाव्या आणि टी-२० मध्ये चौथ्या स्थानावर आहे. याशिवाय, भारतीय संघानं वर्ल्डकप स्पर्धेत आजवर पाकिस्तानविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. 

टॅग्स :विराट कोहलीपाकिस्तानबीसीसीआय