Join us  

हारिस रौफचा 'पगार' बंद! पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय, जाणून घ्या कारण

वेगवान गोलंदाज हारिस रौफचा करार रद्द करण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 6:37 PM

Open in App

तंदुरूस्त असताना देखील आंतरराष्ट्रीय संघात न खेळल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक मोठा निर्णय घेतला आहे. वेगवान गोलंदाज हारिस रौफचा करार रद्द करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानी संघ कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. तिथे हारिस उपस्थित होता पण तो बीग बॅश लीगमध्ये खेळत होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी पाकिस्तानच्या कसोटी संघात सामील होण्यास नकार दिल्यानंतर पीसीबीने मोठी कारवाई केली आहे. खरं तर बोर्डाने वेगवान गोलंदाज हारिस रौफचा केंद्रीय करार रद्द केला आहे. तसेच त्याला ३० जून २०२४ पर्यंत कोणत्याही परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी मिळणार नसल्याचे स्पष्ट केले. 

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हारिस रौफचा वार्षिक करार रद्द केला आहे. बोर्डाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, पीसीबी व्यवस्थापनाने वेगवान गोलंदाजाला उत्तर देण्याची संधी दिली होती परंतु ३० जानेवारी २०२४ रोजी बोर्डाच्या न्यायाच्या तत्त्वांनुसार त्याचा प्रतिसाद असमाधानकारक घोषित करण्यात आला अन् ही कारवाई करण्यात आली. 

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे म्हणणे आहे की, पाकिस्तानसाठी खेळणे हा कोणत्याही खेळाडूसाठी सर्वोच्च सन्मान आणि विशेषाधिकार आहे. कोणताही वैद्यकीय अहवाल किंवा वैध कारण नसताना पाकिस्तानच्या कसोटी संघाचा भाग होण्यास नकार देणे हे केंद्रीय कराराचे उल्लंघन आहे. त्यामुळे हारिस रौफवर ही कारवाई करण्यात आली. 

काय आहे संपूर्ण प्रकरण? ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी पाकिस्तान संघाचा मुख्य निवडकर्ता वहाब रियाझ आणि व्यवस्थापनाने कसोटी मालिकेदरम्यान रौफचा अल्प कालावधीसाठी वापर करण्याबाबत चर्चा केली होती. पण हारिस रौफने मालिकेतून माघार घेतल्यानंतर रियाझ म्हणाला होता की, हारिसने अशा वेळी पाकिस्तानकडून खेळायला हवे होते जेव्हा संघाला काही अनुभवी खेळाडूंची गरज होती. पण, हारिसने तंदुरूस्त नसल्याचे कारण सांगत आंतरराष्ट्रीय संघात खेळण्यास नकार दिला आणि बीग बॅश लीग खेळली. खरं तर कसोटी क्रिकेट सोडून बीग बॅश लीगमध्ये ट्वेंटी-२० खेळण्यास प्राधान्य देणे हारिसला चांगलेच महागात पडल्याचे दिसते.

टॅग्स :पाकिस्तानआंतरराष्ट्रीय क्रिकेटबिग बॅश लीग