अबुधाबी : हसन अली याची भेदक गोलंदाजी आणि इमान उल हक याने पदार्पणातच केलेल्या शतकी खेळीच्या बळावर पाकिस्तानने तिस-या दिवस-रात्र मर्यादित षटकांच्या लढतीत श्रीलंकेवर ७ गडी राखून मात केली. या विजयाबरोबर पाकिस्तानने ५ वन-डे सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
हसन अली याने ३४ धावांत घेतलेल्या ५ बळींच्या जोरावर पाकिस्तानने श्रीलंकेला ४८.२ षटकांत २०८ धावांत गुंडाळले. श्रीलंकेकडून उपुल थरंगाने सर्वाधिक ८० चेंडूंत ६१ धावा केल्या. थिसारा परेराने ५ चौकारांसह ३८ आणि लाहिरू थिरिमन्ने याने २८ धावांचे योगदान दिले. थरंगाने निरोशन डिकवेला (१८) याच्या साथीने सलामीला ५९ धावांच्या भागीदारी केली. याशिवाय कोणतीही मोठी भागीदारी न झाल्याने श्रीलंकेला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली नाही. हसन अली याला शदाब खान याने ३७ धावांत २ गडी बाद करीत सुरेख साथ दिली.
इमान उल हकच्या शानदार शतकी खेळीच्या बळावर पाकिस्तानने विजयी लक्ष्य ४२.३ षटकांत फक्त ३ फलंदाज गमावत सहज पूर्ण केले. इमान उल हक याने १२५ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह १०० धावा केल्या. त्याने फखर जमान याच्या साथीने सलामीसाठी ७८, बाबर आझमच्या साथीने ५९ आणि महंमद हाफीज याच्या साथीने ५९ धावांची भागीदारी करीत पाकिस्तानचा विजय सुकर केला. फखर जमान याने २९, बाबर आझमने ३० व मोहंमद हाफीजने नाबाद ३४ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका : ४८.२ षटकांत सर्वबाद २०८. (उपुल थरंगा ६१, थिसारा परेरा ३८, लाहिरू थिरिमन्ने २८. हसन अली ५/३४, शादाब खान २/३७).
पाकिस्तान : ४२.३ षटकांत ३ बाद २०९. (इमान उल हक १००, फखर जमान २९, बाबर आझम ३०, महंमद हाफीज नाबाद ३४).