Join us  

पाकिस्तानचा फलंदाज Spot-Fixing मध्ये अडकला, थेट तुरुंगात गेला

स्पॉट फिक्सिंग हे पाकिस्तानसाठी नवं नाही.  पाकिस्तान संघाचे अनेक खेळाडू यात अडकले आहेत आणि त्यांना शिक्षाही झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2020 8:20 AM

Open in App

स्पॉट फिक्सिंग हे पाकिस्तानसाठी नवं नाही.  पाकिस्तान संघाचे अनेक खेळाडू यात अडकले आहेत आणि त्यांना शिक्षाही झाली आहे. त्यात आणखी एका खेळाडूची भर पडली आहे. पाकिस्तानचा फलंदाज नासीर जमशेद याला स्पॉट फिक्सिंग प्रकरणी 17 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये सहकारी खेळाडूला लाच देण्याचे कृत्य त्यानं केलं. त्याच्यासह ब्रिटीश नागरिक असलेल्या युसूफ अन्वर आणि मोहम्मद इजाझ यांनाही अटक करण्यात आली आणि तपासादरम्यान तिघांना आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. जमशेदला 17 महिन्यांचा, अन्वरला 40, तर इजाझला 30 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे.

पाकिस्तान सूपर लीगमध्ये इस्लामाबाद युनायटेड आणि पेशावर झाल्मी यांच्यातील सामन्यात खेळाडूंना खराब कामगिरीसाठी प्रोत्साहन देण्याच्या आरोपात जमशेद दोषी आढळला. तपासात 2016मध्ये बांगलादेश प्रीमिअर लीगमध्येही या तिघांनी फिक्सिंग करण्याचा डाव असल्याचे समोर आले आहे. बांगलादेश प्रीमिअर लीगच्या सामन्यात जमशेदला दोन निर्धाव चेंडू खेळायचे होते, परंतु नंतर त्यातून माघार घेण्यात आली. पीएसएलमध्ये स्पॉट फिक्सिंगचे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले आहेत. त्यानं शर्जील खानला इस्लामाबाद विरुद्धच्या सामन्यात दुसऱ्या षटकात दोन चेंडू डॉट खेळण्यासाठी प्रोत्साहीत केले होते. पाकिस्तान क्रिकेट मंडळानं शर्जीलवर पाच वर्षांच्या बंदीची कारवाई केली आहे. 

जमशेदनं पाकिस्तानसाठी 2 कसोटी, 48 वन डे आणि 18 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. सुरुवातीला त्यानं या आरोपांचे खंडन केले होते, परंतु तपासाअंती तो दोषी आढळला. पाकिस्तान क्रिकेट मंडळानं त्याला गतवर्षी 10 वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावली होती. 

टॅग्स :पाकिस्तानमॅच फिक्सिंग