Join us  

पद्माकर शिवलकर आणि पांडुरंग साळगावकर या दिग्गजांचा होणार सन्मान

पांडुरंग साळगावकर हे माजी भारतीय क्रिकेटपटू १९७१ – ७२ ते १९८१-८२ या काळात महाराष्ट्रासाठी वेगवान गोलंदाज म्हणून खेळले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 8:33 PM

Open in App

मुंबई : नामांकित माजी क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर आणि पांडुरंग साळगावकर यांच्या गेल्या अनेक दशकांतील क्रिकेटमधील योगदानाची सन्मानपूर्वक नोंद घेत, ​​भारताची आघाडीची खासगी आयुर्विमा कंपनी, आयडीबीआय फेडरल लाइफ इन्शुरन्स तर्फे मंगळवार दिनांक ३ डिसेंबर रोजी नॅशनल लायब्ररी, वांद्रे येथे सायंकाळी ७ वाजता  एका विशेष समारंभात त्यांचा सत्कार करणार येणार आहे.

 

या कृतज्ञता सोहळ्याचे सूत्रसंचालन पत्रकार आणि लेखक द्वारकानाथ संझगिरी करणार असून यामध्ये संजय बांगर, राजू कुलकर्णी, प्रवीण आमरे, सुधीर नाईक, सुलक्षण कुलकर्णी, मिलिंद रेगे, विजय लोकापल्ली आदी क्रिकेटपटू आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या वर्षाच्या सुरूवातीला आयडीबीआय फेडरलने साठच्या दशकातील रणजी ट्रॉफीचे  माजी खेळाडू आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील नामांकित प्रशिक्षक वासु परांजपे यांचा अशाच एका समारंभात सत्कार केला होता.

पद्माकर शिवलकर हे माजी भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेट खेळाडू आहेत. डावखुरा गोलंदाज म्हणून त्यांनी  मुंबईच्या संघात २० वर्षांहून अधिक काळ व्यतील केलेला असून, आतापर्यंतचे ते  संघातील सर्वाधिक बळी घेणारे खेळाडू आहेत. ते त्यांच्या काळातील तंदुरुस्त क्रिकेट खेळाडूंपैकी एक असून, वयाच्या 48 व्या वर्षापर्यंत व्यावसायिक क्रिकेट खेळत होते ही वाखणण्याजोगी बाब आहे. मुंबईच्या रणजी संघातून खेळणाऱ्या पद्माकर शिवलकर यांनी 124 प्रथमश्रेणी सामन्यात 589 बळी टिपले होते. 1972-73 च्या रणजी हंगामात तामिळनाडूविरुद्ध झालेल्या अंतिम लढतीत  त्यांनी  कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना 16 धावांत 8 आणि 18 धावांत 5 बळी टिपले होते. मात्र त्यांनी मुंबईला अनेक रणजी विजेतेपदे जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. तर पतियाळा, दक्षिण पंजाब, दिल्ली आणि हरयाणा या संघांकडून खेळणाऱ्या  राजेंद्र गोयल यांनी 157 प्रथमश्रेणी सामन्यामधून 750 बळी टिपले होते. मात्र त्याकाळात सुभाष गुप्ते, बिशनसिंग बेदी, भागवत चंद्रशेखर आणि इरापल्ली प्रसन्ना असे महान फिरकी गोलंदाज भारतीय संघात असल्याने  प्रथमश्रेणी क्रिकेटमधील दमदार कामगिरीनंतरही त्यांना कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मात्र मिळाली नाही.  

पांडुरंग साळगावकर हे माजी भारतीय क्रिकेटपटू १९७१ – ७२ ते १९८१-८२ या काळात महाराष्ट्रासाठी वेगवान गोलंदाज म्हणून खेळले . व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर  ते पुण्यात क्रिकेट कोचिंग अकादमी चालवतात आणि ते पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये मुख्य खेळपट्टी क्युरेटर आहेत. त्यांनी महाराष्ट्र रणजी करंडक संघाचे मुख्य निवडक म्हणूनही काम पाहिले आहे.

टॅग्स :मुंबई