नागपूर : शेष भारत संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे विश्वचषक स्पर्धेसाठी संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीत कायम राहण्यास उत्सुक आहे. त्याच्या नेतृत्वाखालील शेष भारत संघ मंगळवारपासून इराणी ट्रॉफी लढतीत रणजी ट्रॉफी चॅम्पियन विदर्भ संघाच्या आव्हानाला सामोरे जाईल. त्याचवेळी यजमान विदर्भ संघ २०१७-१८ च्या मोसमातील यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यावेळी विदर्भ संघाने रणजी ट्रॉफी व इराणी करंडक पटकावण्याचा पराक्रम केला होता. विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियममध्ये उभय संघांदरम्यान लढत होणार आहे.
शेष भारत संघात भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेसह सलामीवीर मयांक अग्रवाल, आक्रमक श्रेयस अय्यर व हनुमा विहारी या अव्वल फलंदाजांचा समावेश आहे. इंग्लंड लायन्सविरुद्ध तीन लिस्ट ‘ए’ सामने खेळणाऱ्या रहाणेने दोनदा अर्धशतके झळकावली आहेत. विश्वचषक स्पर्धेत तो राखीव सलामीवीर म्हणून स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. अग्रवाल, अय्यर व विहारी यांच्यासाठी ही मनोधैर्य उंचावणारी लढत आहे. कारण ते विश्वकप स्पर्धेसाठी संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीत नाहीत.
इराणी कप लढतीत चमकदार खेळी करीत रहाणेला निवड समितीचे लक्ष वेधण्याची संधी आहे. दुसºया बाजूचा विचार करता विदर्भाने यंदाच्या रणजी मोसमात कुणा एका खेळाडूच्या वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक कामगिरीच्या जोरावर यश मिळवले. इराणी कप लढतीतही विदर्भ संघ कामगिरीत सातत्य राखेल, अशी आशा प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांना आहे. उमेश यादवला दुखापत असल्यामुळे तो या लढतीत खेळणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. उमेशला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला असून त्याच्या स्थानी यश ठाकूरला संधी मिळण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त विदर्भातर्फे ४१ वर्षीय वसीम जाफर, डावखुरा फिरकीपटू आदित्य सरवटे, यष्टिरक्षक फलंदाज अक्षय वाडकर आणि वेगवान गोलंदाज रजनीश गुरबानी हे खेळाडू छाप सोडण्यास सज्ज आहेत.
शेष भारतची फलंदाजी मजबूत आहे. अव्वल खेळाडूंव्यतिरिक्त अनमोलप्रीत सिंग व युवा ईशान किशन यांच्याकडून चमकदार कामगिरीची आशा आहे.
शेष भारतची गोलंदाजी मात्र कमकुवत भासत आहे. उत्तर प्रदेशचा अंकित राजपूत, राजस्थानचा तन्वीर-उल-हक आणि केरळचा संदीप वॉरियर हे गोलंदाज नव्या चेंडूने छाप सोडण्यास सज्ज आहेत. फिरकी गोलंदाजीची भिस्त सौराष्ट्रचा धर्मेंद्रसिंग जडेजा आणि आॅफ स्पिनर क्रिष्णप्पा गौतम यांच्यावर अवलंबून राहील.
सरवटेकडून मोठ्या अपेक्षा
विदर्भाला जाफर व्यतिरिक्त कर्णधार फैज फझल व सलामीवीर संजय रामास्वामी यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा राहील. तसेच अष्टपैलू सरवटे गोलंदाजी व फलंदाजीत संघासाठी उपयुक्त खेळाडू आहे. अंतिम लढतीत त्याने दोन्ही डावात चेतेश्वर पुजाराला बाद केले होते.
प्रतिस्पर्धी संघ
विदर्भ : फैज फझल (कर्णधार), संजय रामास्वामी, वसीम जाफर, मोहित काळे, गणेश सतीश, अक्षय वाडकर, सिद्धेश वाठ, आदित्य सरवटे, अक्षय कर्णेवार, अक्षय वखरे, दर्शन नळकांडे, रजनीश गुरबानी, यश ठाकूर, सुनिकेत बिंगेवार, अथर्व तायडे.
शेष भारत संघ : मयांक अग्रवाल, ईशान किशन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), हनुमा विहारी, श्रेयस अय्यर, स्नेल पटेल, अनमोलप्रीत सिंग, क्रिष्णप्पा गौतम, रोनित मोरे, धर्मेंद्रसिंग जडेजा, अंकित राजपूत, राहुल चहर, संदीप वॉरियर, तन्वीर उल-हक, रिंंकू सिंग.