Join us  

अजिंक्य रहाणेची फटकेबाजी; भारताच्या वर्ल्ड कप संघातील स्थानासाठी दावेदारी

आगामी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा भारतीय संघ निवडण्याची प्रोसेस सूरू आहे.  वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघात प्रवेश मिळवण्यासाठी अजिंक्य रहाणे व रिषभ पंत हेही शर्यतीत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 3:52 PM

Open in App

मुंबई : आगामी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा भारतीय संघ निवडण्याची प्रोसेस सूरू आहे.  वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघात प्रवेश मिळवण्यासाठी अजिंक्य रहाणे व रिषभ पंत हेही शर्यतीत आहे. रहाणेने आपल्या कामगिरीने निवड समितीचे लक्ष वेधले आहे. इंग्लंड लायन्सविरुद्धच्या दुसऱ्या वन डेत त्याने 91 धावांची खेळी करताना सलग दुसरे अर्धशतक झळकावले. सातत्यपूर्ण कामगिरी करून तो भारताच्या वर्ल्ड कप संघातील स्थानावर दावेदारी सांगण्यास प्रयत्नशील आहे.

शिखर धवन याला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात सूर गवसला असला तरी बीसीसीआय त्याला पर्याय शोधत आहेत. त्याशिवाय मधल्या फळीतील घडी अजून व्यवस्थित बसलेली नाही. त्यामुळे निवड समितीने अजिंक्य रहाणे व रिषभ पंत यांना त्यादृष्टीने तयार राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे भारत A आणि इंग्लंड लायन्स यांच्यातील वन डे मालिकेकडे निवड समिती सदस्य लक्ष ठेवून आहेत. 

इंग्लंड लायन्सविरुद्घच्या पहिल्या सामन्यात रहाणेने 59 धावा करताना भारत A संघाला 3 विकेट्स राखून विजय मिळवून दिला होता. शुक्रवारी सुरु असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारत A संघाने 6 बाद 303 धावा कुटल्या. कर्णधार रहाणेने 117 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकार खेचून 91 धावांची खेळी केली. त्याला हनुमा विहारी ( 92) आणि श्रेयस अय्यर ( 65) यांची उत्तम साथ लाभली. प्रत्युत्तरात इंग्लंड लायन्स संघाचे 6 फलंदाज 116 धावांवर माघारी परतले आहेत. 

रिषभ पंतही या मालिकेत खेळणार आहे. अखेरच्या दोन सामन्यांसाठी त्याची संघात निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने त्याला सलामीला खेळण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

टॅग्स :अजिंक्य रहाणेबीसीसीआय