Shikhar Dhawan love his son Zoravar ( Marathi News ) : भारताचा अनुभवी फलंदाज शिखर धवनने त्याचा मुलगा जोरावरच्या नवव्या वाढदिवसानिमित्त ( २६ डिसेंबर) एक भावनिक चिठ्ठी लिहिली होती, ज्यामध्ये त्याने एका वर्षापासून आपल्या मुलाला भेटता न आल्याची खंत व्यक्त केली होती. धवनने खुलासा केला की, तो आणि त्याचा मुलगा यांच्यातील संवादाची सर्व साधने बंद करण्यात आली आहेत.
त्याने आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त भावनिक पोस्ट का शेअर केली याबद्दल नुकतेच मत व्यक्त केले. ह्युमन्स ऑफ बॉम्बेसोबत पॉडकास्टवर बोलताना धवन म्हणाला, "मला वेदना होत नव्हत्या. मी फक्त माझे विचार मांडत होतो. पाच महिने मी त्याच्याशी बोललो नव्हतो. मी फक्त भावना व्यक्त करत होतो. मी एक भावनिक माणूस आहे आणि मी फक्त त्याला प्रेम पाठवण्याचा प्रयत्न करत होतो. मी त्याच्याबद्दल विचार करत असताना दु: खी झालो की त्याला नकारात्मक ऊर्जा मिळेल. ही पोस्ट व्हायरल झाली हे मला कधीच कळले नाही. मी जे लिहिले ते मनापासून लिहिले होते."
"तंत्रज्ञानाच्या युगात माझा मुलगा कदाचित माझी पोस्ट वाचेल, या आशेने मी ते लिहिले. तो कुठेही असेल, मला आशा आहे की तो आनंदी आहे. एक दिवस तो येईल आणि मला दिसेल. मी त्याच्या प्रेमात आहे, पण त्याच वेळी मी अलिप्त आहे. मला त्याच्यावर कोणतंही दडपण टाकायचे नाही," असेही तो म्हणाला.
२६ डिसेंबर २०१४ रोजी जोरावरचा जन्म झाला. शिखर धवन आणि त्याची माजी पत्नी आयेशा मुखर्जी यांचा गेल्या वर्षी घटस्फोट झाला आणि जोरावर सध्या त्याच्या आईसोबत ऑस्ट्रेलियात राहतो. "मी त्याला रोज मेसेज लिहितो, त्याला ते मिळतात की नाही माहीत नाही," असेही धवनने सांगितले.
त्याने नमूद केले की त्याला मुलाची आठवण येते, परंतु त्याने हे वास्तव स्वीकारले आहे. तो म्हणाला, "मी त्याला रोज मॅसेज लिहितो, त्याला ते मिळतात की नाही, तो वाचतोय की नाही हे मला माहीत नाही. मला काही अपेक्षा नाहीत. मी वस्तुस्थिती स्वीकारले आहे. मी वडील आहे आणि मी माझे कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. मला त्याची आठवण येते. मला वाईट वाटते. जेव्हा मी त्याला भेटायला जायचो तेव्हा त्याला फक्त दोनदा भेटण्याची परवानगी होती ती सुद्धा फक्त दोन ते तीन तासांसाठी. माझी इच्छा आहे जोरावर माझ्याभोवती असावा. मला त्याला मिठी मारायची आहे."
शिखर धवन इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या २०२४ च्या आवृत्तीमध्ये पंजाब किंग्ज (PBKS) संघाचे नेतृत्व करणार आहे.