ENG vs NZ Test : इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यातल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दोन आश्चर्यचकित करणारे झेल पाहायला मिळाले आणि या दोन्ही विकेट इंग्लंडच्या जॅक लिचला मिळाल्या. न्यूझीलंडच्या पहिल्या डावात हेन्री निकोल्स याचा झेल चर्चेत राहिला, तर आज किवींच्या दुसऱ्या डावात निल वॅगनरच्या ( Neil Wagner) बाद होण्याची चर्चा सुरूय... लिचच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक सॅम बिलिंग्स ( Sam Billings) चक्क गुडघ्यांच्या मदतीने झेल टिपला. न्यूझीलंडचा दुसरा डाव ३२६ धावांवर गुंडाळला गेल्याने इंग्लंडसमोर विजयासाठी २९६ धावांचे लक्ष्य आहे.
किवींच्या पहिल्या डावातील ३२९ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडची अवस्था ६ बाद ५५ अशी झाली होती. पण, जॉन बेअरस्टो ( १६२) व पदार्पणवीर जेमी ओव्हर्टन ( ९७) यांनी डाव सावरला. स्टुअर्ट ब्रॉडनेही ४२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करताना इंग्लंडला ३६० धावांपर्यंत मजल मारून दिली. किवींच्या दुसऱ्या डावात टॉम लॅथम ( ७६), कर्णधार केन विलियम्सन ( ४८), डॅरील मिचेल ( ५६) व टॉम ब्लंडल ( ८८) यांनी सुरेख खेळ केला. मिचेल व ब्लंडल या जोडीने पुन्हा एकदा किवींचा डाव सावरला. मिचेलने या दौऱ्यावर ६ डावांत १०७.६०च्या सरासरीने सर्वाधिक ५३८ धावा केल्या आहेत.
किवींचा दुसरा डाव ३२६ धावांवर गडगडला. पहिल्या डावात ५ विकेट्स घेणाऱ्या जॅक लिचने दुसऱ्या डावातही त्याची पुनरावृत्ती केली. मॅथ्यू पॉट्सने तीन विकेट्स घेतल्या. इंग्लंडला ही मालिका ३-० अशी जिंकण्यासाठी २९६ धावा कराव्या लागणार आहेत.