Join us  

NZvIND : विराट कोहलीकडून झाली मोठी चूक, नाहीतर भारताने सामना जिंकला असता...

भारताने या सामन्यात धावांचा डोंगर उभारला होता. पण तरीही त्यांना पराभव पत्करावा लागला. भारताच्या गोलंदाजांनी यावेळी जास्त धावा दिल्या आणि त्यामुळे भारताला पराभव पत्करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2020 5:09 PM

Open in App

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या वन डे मालिकेतील पहिल्यात सामन्यात धावांचा पाऊस पाहायला मिळाला. पण यामध्ये अखेर बाजी मारली ती यजमान न्यूझीलंडने. पण हा सामना चांगलाच अटीतटीचा झाला. हा सामना जिंकण्याची भारतालाही संधी होती. पण भारताचा कर्णधार विराट कोहलीकडून एक मोठी चूक घडली आणि त्यामुळेच भारताला पराभव पत्करावा लागला, असे मत काही तज्ञांनी व्यक्त केले आहे.

भारताने या सामन्यात धावांचा डोंगर उभारला होता. पण तरीही त्यांना पराभव पत्करावा लागला. भारताच्या गोलंदाजांनी यावेळी जास्त धावा दिल्या आणि त्यामुळे भारताला पराभव पत्करावा लागला. या पराभवाचे मुख्य कारण काय आहे, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण भारताचे माजी कर्णधार आणि समाचोलक सुनील गावस्कर यांनी या पराभवाचे मुख्य कारण सांगितले आहे.

ट्वेंटी-20 मालिकेतील मानहानीकारक पराभव, कर्णधार केन विलियम्सला झालेली दुखापत या दुहेरी संकटातून वाट काढत यजमान न्यूझीलंड संघाने वन डे मालिकेत दणक्यात सुरुवात केली. भारताच्या 347 धावांच्या प्रत्युत्तरात किवी फलंदाजांनी सुरेख खेळ केला. कोणतीही घाई न करता त्यांनी हे लक्ष्य सहज पार केले. रॉस टेलर, हेन्री निकोल्स आणि कर्णधार टॉम लॅथम यांना या विजयाचे श्रेय द्यायला हवं. या विजयासह न्यूझीलंडनं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

या पराभवाचे कारण सुनील गावस्कर यांनी सांगितले की, " भारताला या सामन्यात चांगली गोलंदाजी न झाल्यामुळे पराभव स्वीकारावा लागला. प्रत्येक सामन्यात गोलंदाज चागंली कामगिरी करतील, असे नसते. काही दिवस वाईटही असतात. पण त्यावेळी अन्य पर्याय तुमच्याकडे खुले असावे लागतात. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने केदार जाधवला गोलंदाजी करण्याची संधी दिली नाही. ही गोष्ट भारतासाठी नुकसानकारक ठरली."

वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल या भारतीय सलामीवीरांनी साजेशी सुरुवात केली. दोघांनी आठ षटकांत अर्धशतकीय भागीदारी केली. कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी टीम इंडियाच्या डावाला आकार दिला. विराट अन् श्रेयसची 102 धावांची भागीदारी ईश सोढीनं सुंपष्टात आणली. 29व्या षटकातील चौथा चेंडू मॅजिकल ठरला. सोढीनं टाकलेल्या त्या चेंडूनं विराटच्या बॅट-पॅडमधून वाट काढत यष्टिंचा वेध घेतला. विराटही काही काळ हतबल झालेला पाहायला मिळाला. तो 63 चेंडूंत 6 चौकारांसह 51 धावा करून तंबूत परतला. श्रेयसनं  चौथ्या विकेटसाठी लोकेश राहुलसह शतकी भागीदारी केली. श्रेयस 107 चेंडूंत 11 चौकार व 1 षटकार खेचून 103 धावांवर मिचेल सँटनरच्या हाती झेलबाद झाला. त्यानंतर लोकेश व केदार जाधवनं फटकेबाजी केली. भारतानं 50 षटकांत 4 बाद 347 धावांचा डोंगर उभा केला. लोकेश 64 चेंडूंत  3 चौकार व 6 षटकारांसह 88 धावांवर नाबाद राहिला. 

लक्ष्याचा पाठलाग करताना मार्टीन गुप्तील आणि हेन्री निकोल्स यांनी सावध सुरुवात करताना संघाला पहिल्या दहा षटकांत बिनबाद 54 धावा केल्या. या दोघांनी हळुहळु धावांचा वेग वाढवला. भारतीय गोलंदाजांना किवी फलंदाजांना बाद करण्यात अपयश आलेले पाहायला मिळाले. 15 षटकांत किवींनी बिनबाद 83 धावा केल्या होत्या. पण, 16वं षटक किवींसाठी धोक्याचं ठरलं. शार्दूल ठाकूरच्या गोलंदाजीवर अपरकट मारण्याचा प्रयत्न करणारा मार्टीन गुप्तील ( 32)  केदार जाधवच्या हाती झेल देऊन माघारी परतला. या सामन्यातून वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या टॉम ब्लंडेल आणि निकोल्स यांच्यावर जबाबदारी आली. किवींनी 18व्या षटकात शतकी आकडा पार केला.

त्यानंतर कुलदीप यादवनं ब्लंडेलला माघारी पाठवलं. लोकेश राहुलनं जलद स्टम्पिंग केली. पण, कुलदीपनेच किवींच्या रॉस टेलरचा सोपा झेल सोडला. त्याच टेलरनं तिसऱ्या विकेटसाठी निकोल्ससह अर्धशतकी भागीदारी केली. पण, 29व्या षटकात एक धाव चोरण्याच्या नादात किवींनी मांडलेला डाव मोडला. विराटनं चपळ क्षेत्ररक्षण करताना निकोल्सला धावबाद केले. निकोल्स 82 चेंडूंत 11 चौकारांसह 78 धावा करून माघारी परतला. तरीही किवींनी धावांची सरासरी जवळपास सहाची ठेवली होती. रॉस टेलरनं अर्धशतक पूर्ण करताना किवींच्या आशा कायम राखल्या होत्या. 35 षटकापर्यंतच्या टीम इंडियाच्या धावांच्या तुलनेत किवी खूप पुढे होते. 

कर्णधार टॉम लॅथमनं चौथ्या विकेटसाठी रॉसला तोडीसतोड साथ देताना अर्धशतकी खेळी केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना भारतीय गोलंदाजांना हतबल केले. टॉम लॅथम व रॉस यांनी वाहत्या गंगेत हात धुवावे तसे भारतीय गोलंदाजांना बदडले. पण, 42व्या षटकात ही जोडी तुटली. कुलदीपनं भारताला विकेट मिळवून दिली. टॉम 48 चेंडूंत 8 चौकार व 2 षटकार खेचून 69 धावांवर माघारी परतला. त्यामुळे पुन्हा एकदा न्यूझीलंड तोंडचा घास हिरावतात की काय, अशी शंका निर्माण झाली होती. पण, रॉसनं 73 चेंडूंत शतक पूर्ण केले. न्यूझीलंडचे तीन फलंदाज झटपट माघारी परतल्यामुळे सामन्यात चुरस निर्माण झाली. टॉम लॅथम, जिमी निशॅम आणि कॉलीन डी ग्रँडहोम यांची विकेट सामन्याला कलाटणी देते की काय असे वाटत होते. पण, रॉस खेळपट्टीवर तग धरून होता. 

टॅग्स :विराट कोहलीसुनील गावसकरभारत विरुद्ध न्यूझीलंड