Join us

NZ vs IND 1st Test: एका पराभवामुळे टीका होत असेल तर काही करू शकत नाही - कोहली

सामन्यानंतर कोहली म्हणाला, ‘आम्ही चांगला खेळ केला नाही, याची आम्हाला कल्पना आहे, पण लोक याला मुद्दा बनवीत असतील तर आम्ही काय करू शकतो. कारण आम्ही असा विचार करीत नाही.’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 01:46 IST

Open in App

वेलिंग्टन : न्यूझीलंडने पहिल्या कसोटी सामन्यात आमच्यावर प्रत्येक विभागात मात केली, अशी स्पष्ट कबुली देणारा भारतीय कर्णधार विराट कोहली म्हणाला की, ‘जर काही लोक १० गड्यांच्या या पराभवाला मुद्दा बनवीत असतील, तर त्यात मी काही करू शकत नाही.’सामन्यानंतर कोहली म्हणाला, ‘आम्ही चांगला खेळ केला नाही, याची आम्हाला कल्पना आहे, पण लोक याला मुद्दा बनवीत असतील तर आम्ही काय करू शकतो. कारण आम्ही असा विचार करीत नाही.’ तसेच, ‘एका कसोटी सामन्यातील पराभवाकडे या दृष्टीने का बघितले जाते, हे कळले नाही. आमच्या संघासाठी जग संपले आहे, अशी टीका होत आहे,’ असेही कोहली म्हणाला.कोहलीने पुढे सांगितले की, ‘काही लोकांसाठी हा जगाचा अंत असू शकतो, पण असे नाही. आमच्यासाठी हा एक क्रिकेट सामना होता. त्यात आम्हाला पराभव स्वीकारावा लागला. आम्ही उंचावलेल्या मानेने पुढे वाटचाल करणार आहोत. पराभव स्वीकारणे संघाचे चरित्र स्पष्ट करणारे आहे. मायदेशातही विजय मिळविण्यासाठी चांगले खेळावे लागते, याची आम्हाला कल्पना आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोपे काहीच नसते. कारण संघ येतो आणि तुम्हाला पराभूत करून जातो. ते तुम्हाला स्वीकारावे लागते. यावरून संघाचे चरित्र दिसून येते. संघाने जर बाहेरच्या टीकेवर लक्ष दिले असते तर हा संघ येथे नसता जेथे सध्या आहे.’कोहली पुढे म्हणाला, ‘आम्ही जर बाहेरच्या प्रतिक्रियेकडे लक्ष दिले असते तर क्रमवारीत सातव्या-आठव्या स्थानी असतो. लोक काय म्हणतात, याला आम्ही महत्त्व देत नाही.’ कसोटी क्रिकेटमध्ये सलग विजय मिळविणारा संघ एका पराभवामुळे रात्रभरात वाईट होत नाही, असे सांगत कोहली म्हणाला, ‘जर आम्ही पराभूत झालो, तर ते स्वीकारण्यास कुठली लाज नाही. याचा अर्थ आम्ही या लढतीत चांगले खेळलो नाही. याचा अर्थ हा नाही की एका रात्रीत आमचा संघ खराब झाला आहे.’ख्राईस्टचर्चमध्ये शनिवारपासून होणाऱ्या दुसºया कसोटीत संघ पुनरागमन करेल, असा विश्वास व्यक्त करीत कोहली म्हणाला, ‘आम्ही कसून मेहनत घेऊन चार दिवसांमध्ये असेच खेळू जसे गेल्या काही वर्षांपासून खेळत आहोत. एका पराभवामुळे विश्वास गमावलेला नाही. ड्रेसिंग रूमचा विचार वेगळा असून संघातील वातावरण वेगळ आहे.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडविराट कोहली