Join us  

NZ vs ENG: इंग्लंडच्या जो रुटला सूर गवसला; मोहम्मद अझरुद्दीनसह ख्रिस गेलचाही विक्रम मोडला

इंग्लंडच्या जो रुटनं सोमवारी न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत विक्रमी कामगिरी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 12:43 PM

Open in App

इंग्लंडच्या जो रुटनं सोमवारी न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत विक्रमी कामगिरी केली. पहिल्या कसोटीतील पराभवानंतर इंग्लंडचा या कसोटीत पुनरागमनाचा प्रयत्न आहे. न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील 375 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडनं 476 धावा केल्या. इंग्लंडच्या या खेळीत कर्णधार जो रुटचा मोठा वाटा आहे आणि त्याच्या खेळीनं भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन ( 1990) आणि वेस्ट इंडिडच्या ख्रिस गेल ( 2008) यांचा विक्रम मोडला.

न्यूझीलंडनं टॉम लॅथमच्या 105 खेळीच्या जोरावर पहिल्या डावात 375 धावा केल्या. त्याला रॉस टेलर ( 53), बीजे वॉटलिंग ( 55) आणि डेरील मिचेल ( 73) यांची उत्तम साथ लाभली. इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. डॉम सिब्ली आणि जो डेन्ली यांना अपयश आल्यामुळे इंग्लंडची अवस्था 2 बाद 24 अशी झाली होती. पण, रोरी बर्न्स आणि कर्णधार रूट यांनी इंग्लंडचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 173 धावांची भागीदारी केली. बर्न्स 209 चेंडूंत 15 चौकारांच्या मदतीनं 101 धावा करून माघारी परतला.

त्यानंतर पुन्हा इंग्लंडला घरघर लागली. बेन स्टोक्स ( 26) आणि झॅक क्रॅवली ( 1) यांना फार कमाल करता आली नाही. ऑली पोपनं रुटसह इंग्लंडची खिंड लढवली. पोप 202 चेंडूंत 75 ( 6 चौकार) धावा करून माघारी परतला. पण, रूट एका बाजूनं खेळपट्टीवर चिकटून होता. त्यानं 441 चेंडूंत 22 चौकार व 1 षटकार मारून 226 धावा चोपल्या. अन्य फलंदाज फार काही कमाल न करू शकल्यानं इंग्लंडचा पहिला डाव 476 धावांवर गडगडला. रुटनं या द्विशतकी खेळीसह फॉर्म मिळवला, शिवाय न्यूझीलंडमध्ये द्विशतक झळकावणाऱ्या पहिल्या परदेशी कर्णधाराचा मानही पटकावला.

यापूर्वी न्यूझीलंडमध्ये ख्रिस गेल 19 डिसेंबर 2008मध्ये 197 धावांची खेळी केली होती आणि ती न्यूझीलंडमधील प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराची सर्वोत्तम खेळी होती. गेलनं या खेळीसह भारताच्या मोहम्मद अझरुद्दीनचा ( 22 फेब्रुवारी 1990) 192 धावांचा विक्रम मोडला होता. रुटनं आजच्या खेळीनं हे दोन्ही विक्रम मोडत अव्वल स्थान पटकावले. इंग्लंडने पहिल्या डावात घेतलेल्या 101 धावांचा पाठलाग करताना किवींनी चौथ्या दिवसअखेर 2 बाद 96 धावा केल्या आहेत. कर्णधार केन विलियम्सन नाबाद 37 आणि रॉस टेलर नाबाद 31 धावांवर खेळत आहे.

टॅग्स :जो रूटइंग्लंडन्यूझीलंडख्रिस गेल