- सुनील गावसकर लिहितात...
भारताच्या वेगवान गोलंदाजांनी केपटाऊनच्या नूलँड्स क्रिकेट मैदानावर भेदक मारा केला. त्यांच्यासाठी तेथील परिस्थिती अनुकूल होती. रविवारी दिवसभर पाऊस. त्यामुळे हिरवळ असलेल्या खेळपट्टीवरील कव्हर बाजूला झालेच नाही. त्याचप्रमाणे आज चौथ्या दिवशी ढगाळ वातावरण होते. त्यामुळे चेंडू हवेत स्विंग होत होता. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना येथे भारतीय मारा खेळताना अडचण भासत होती. केवळ शैलीदार एबी डिव्हिलियर्स सहजपणे खेळत असल्याचे चित्र दिसले.
भारताचे क्षेत्ररक्षणही दर्जेदार होते. कोहलीने सजविलेले क्षेत्ररक्षणही उल्लेखनीय होते. उपाहारानंतर सूर्याचे दर्शन झाले आणि खेळपट्टी काही अंशी कोरडी होण्यास सुरुवात झाली. पण त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांच्या चेंडूला उसळी मिळण्यास मदत मिळाली. त्यामुळे येथे खेळताना भारतीय फलंदाजांना अडचण भासली. धवनला दक्षिण आफ्रिका व आॅस्ट्रेलियात आखूड टप्प्याचा मारा खेळताना अडचण भासते. त्याची प्रचिती आजही आली. पुजारा अपेक्षेपेक्षा अधिक उसळलेल्या चेंडूवर बाद झाला. उसळी घेणाºया खेळपट्टीवर फलंदाजांनी बॅकफूटचा आणि क्रीझच्या खोलीचा वापर केला नाही तर ते अडचणीत येतात. त्यामुळेच सराव सामने आवश्यक ठरतात. तेथे त्यांना आखूड टप्प्याच्या माºयावर खेळण्याचा सराव करता येतो.
मोहम्मद शमीच्या चेंडूतील वेग तसेच बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांचा अचूक मारा यामुळे यजमान फलंदाजांच्या नाकीनऊ आले होते. तथापि, आफ्रिकेला तुल्यबळ उत्तर देण्यात हार्दिक पंड्याची
भूमिका निर्णायक ठरली. हा युवा खेळाडू सामन्यागणिक प्रकाशमान होत आहे. परिस्थिती ओळखून खेळ करण्याची त्याची शैली अप्रतिम आहे. त्याच्या कारकिर्दीला आकार देण्यात राहुल द्रविड यांचे योगदान
नाकारता येणार नाही. युवा अवस्थेपासूनच द्रविड यांनी पंड्याच्या खेळात बदल घडवून आणला, शिवाय त्याच्यात आक्रमकतेचा संचारही केला होता.
पंड्याने दुसºया डावात फलंदाजीत कमाल केली नाही, तोच भारताच्या फलंदाजीतील उणिवा चव्हाट्यावर आल्या. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी गमावणे हे पुढील प्रवासात फार महागडे ठरू शकते. मालिकेच्या सुरुवातीला सराव सामने नसणे हे देखील पाहुण्या संघासाठी महागडे ठरण्याची चिन्हे आहेत. या मालिकेत जय-पराजयाचे अंतर फारच कमी असेल. (पीएमजी)