सचिन कोरडे ।
गोवा : गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार, अशी चर्चा गेली दहा वर्षे रंगत असली तरी पायाभूत सुविधा आणि स्पर्धेच्या तयारीबाबत मात्र भलेमोठे प्रश्नचिन्हच आहे. गोव्यात होणाºया या स्पर्धांच्या तयारीबाबतचा आढावा घेण्यासाठी आलेल्या भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे (आयओए) संयुक्त सचिव आनंदेश्वर पांडे यांच्या पदरी पुन्हा निराशा पडली.
आयओएचे प्रतिनिधी म्हणून पांडे गोव्यात आले होते. गोवा आॅलिम्पिक असोसिएशनच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत त्यांनी आता सरकार हमी देत असेल तरच या स्पर्धा गोव्यात होतील असे सांगत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणने या स्पर्धा आयोजनासाठी लाल पायघड्या घातल्या असून आम्हाला नाही तर पर्यायी विचार करावा लागेल, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
त्यांनी आपल्या दोन दिवसीय दौºयात येथील विविध स्पर्धा केंद्रांचा आढावा घेतला. सरकार पातळीवर सुरु असलेल्या कामावर त्यांनी समाधान आणि विश्वास व्यक्त केला मात्र गोवा आॅलिम्पिक संघटनेच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘आयओए’च्या बैठकीत चुकीची माहिती देणे, आयओएला अंधारात ठेवणे तसेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा पाठपुरावा न करणे असे आरोप त्यांनी लावले.
‘आम्हाला गोवा आॅलिम्पिक संघटनेवर कोणताही भरोसा राहिलेला नाही. गोव्यात राष्ट्रीय स्पर्धा व्हाव्या असे वाटत असेल तर मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर स्पर्धेच्या तयारीची हमी द्यावी नाहीतर आम्ही या स्पर्धा दुसरीकडे आयोजित करु. बरीच राज्य या यजमानपदासाठी आग्रही आहेत.
गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ आहे. भारतातील प्रत्येक जण येथे येण्यास उत्सुक आहे. इतर राज्य संघटनांचाही गोव्याला पाठींबा आहे. त्यामुळे सरकारने ही संधी दवडू नये असेही पांडे यांनी सांगितले.