Join us  

IPL 2020: कर्णधार बदलण्याची गरज नाही,‘फिनिशर्स’चा शोध घ्या; सेहवागचा आरसीबीला सल्ला

३२ वर्षाच्या विराटच्या नेतृत्वात आरसीबीला एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावता का आले नाही,असा थेट सवाल गंभीरने केला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2020 1:59 AM

Open in App

नवी दिल्ली : पहिल्या विजेतेपदाचे स्वप्न उराशी घेऊन मैदानात उतरलेल्या आरसीबीचा पुन्हा स्वप्नभंग झाला. हैदराबादने विराट कोहलीच्या संघाचा ६ गडी राखून पराभव करीत आव्हान संपुष्टात आणले.

पराभवानंतर आरसीबीला कर्णधारपदासाठी विराट कोहलीचा पुढे विचार करावा लागेलअसे मत माजी खेळाडू गौतम गंभीरने व्यक्त करीत विराटला कर्णधारपदावरून हटवण्याची जोरदार मागणी केली. दुसरीकडे माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने मात्र पुढच्या वर्षीही कोहलीकडेच नेतृत्व सोपवायला हरकत नाही. कर्णधार बदलण्याची गरज नाही, असे विपरीत वक्तव्य केले आहे.

३२ वर्षाच्या विराटच्या नेतृत्वात आरसीबीला एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावता का आले नाही,असा थेट सवाल गंभीरने केला होता. तथापि आरसीबी कोहलीकडे नेतृत्व कायम ठेवेल, असा ठाम विश्वास सेहवागने ‘क्रिकबझ’या वेबसाईटशी बोलताना व्यक्त केला. पुढच्या सत्रात संघाने कामगिरी उंचावण्यासाठी काय करायला हवे, याचा विचार केलेला बरा. माझ्यामते फिनिशर्सची संघाला गरज असल्यामुळे युवा खेळाडूंचा शोध घेत संघाची ताकद वाढवण्यावर भर देणे योग्य राहील,असे सेहवाग म्हणाला.

‘कर्णधार हा संघाची जबाबदारी सांभाळणारा नेता असतो.तो देशाचे नेतृत्व करीत असताना निकाल देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो. वन डे टी-२० आणि कसोटी सामने जिंकण्यात विराटने मोलाचे प्रयत्न केलेले आहेत. तथापि आरसीबीचे नेतृत्व करताना विराटला कामगिरी करण्यात अपयश आल्याचे पहायला मिळाले आहे. 

कामगिरी उंचावण्यासाठी कर्णधाराकडे चांगला संघ देखील असणे महत्त्वाचे ठरते.त्यामुळे आरसीबी व्यवस्थापन कर्णधारपदावरुन विराटची उचलबांगडी करण्यास बाध्य होणार नाही, असा मला विश्वास वाटतो. त्यापेक्षा बळकटी आणण्यासाठी युवा फिनिशर्स संघात कसे आणता येतील,याकडे लक्ष द्यायला हवे. युवा आणि अनुभवी खेळाडूंच्या संयुक्त प्रयत्नातून पुढील सत्रात आरसीबीला घवघवीत यश मिळू शकेल,’असा विश्वास या माजी खेळाडूने व्यक्त  केला आहे.

टॅग्स :विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर