मुंबई : नितीन तोष्णीवाल, सुनील बाबरस, प्रकाश केळकर यांनी आपआपल्या गटाच्या अंतिम सामन्यात बाजी मारून राज्यस्तरीय वेटरन्स टेबल टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. सुहास कुलकर्णी, झर्कसिस खंदादिया आणि परवेज दावर यांनीही स्पर्धेत छाप पाडली. महिलांमध्ये सुषमा नोगारे, सुहासिनी बक्रे आणि मंगला सराफ यांनी वर्चस्व राखले.
वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे झालेल्या या स्पर्धेच्या वेटरन्स टेबल टेनिस स्पर्धेत राज्यभरातून सुमारे २८० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक आहे. दरम्यान, वेटरन्स गटाच्या स्पर्धेनंतर आता राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचा थरार एमआयजी क्लब येथे सुरू आहे.
४०हून अधिक वयोगटात नितीनने बाजी मारताना डी. चंदूरकरचा ११-५, ११-८, ८-११, ११-७ असा पराभव केला. ५० हून अधिक वयोगटामध्ये सुनीलने राम कदमचा ११-५, ११-४, ११-९ असा सहज पराभव करून जेतेपद पटकावले. ६०हून अधिक वयोगटात प्रकाशने बाजी मारताना दिनकर शेलार्काचा ९-११, ११-४, १२-१०, ११-९ असा पराभव केला. सुहास कुलकर्णीने ६०हून अधिक वयोगटाचे जेतेपद जिंकताना दीपक दुधाणेला ७-११, ११-३, ७-११, ११-३, ११-८ असे पराभूत केले. झर्कसिसने ७०हून अधिक वयोगटात बाजी मारताना ए. एस. शेखचा ११-७, ११-९, ११-३ असा धुव्वा उडवला. ७५ हून अधिक वयोगटामध्ये परवेजने झुंजार विजेतेपद पटकावत झर्कसिसचा १२-१०, ११-६, ५-११, ६-११, ११-८ असा पाडाव केला.
सांघिक गटात सांताक्रूझ जिमखाना ‘अ’ संघाने सेंच्युरी वॉरियर्स ‘अ’ संघाचा ३-० असा फडशा पाडून दिमाखात विजेतेपद जिंकले.
>महिलांच्या ४०हून अधिक वयोगटात सुषमा नोगारेने जेतेपद जिंकताना चंद्रमा राजकुमारला ११-४, ११-६, ११-१३, ११-९ असा धक्का दिला. सुहासनीने ५०हून अधिक वयोगटात वर्चस्व राखताना अनघा जोशीचा प्रतिकार १३-११, ११-७, ९-११, ११-९ असा मोडला. तसेच, ६०हून अधिक वयोगटामध्ये मंगलाने जेतेपदाला गवसणी घालताना सुनंदा रावचा ११-८, ११-९, ११-९ असा धुव्वा उडवला.