Join us  

न्यूझीलंडची विंडीजवर सरशी, एक डाव १३४ धावांनी विजय

New Zealand Vs West Indies : न्यूझीलंड चार कसोटी सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आणि भारत व ऑस्ट्रेलियादरम्यानच्या कसोटी मालिकेचा निकाल त्यांच्यासाठी लाभदायक ठरला तर ते कसोटी मानांकनामध्ये अव्वल दोन संघांत स्थान मिळवू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2020 4:48 AM

Open in App

हॅमिल्टन : न्यूझीलंडने पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात रविवारी चौथ्या दिवशी वेस्ट इंडिजचा एक डाव १३४ धावांनी पराभव करीत मायदेशात कसोटी मोसमाची विजयाने सुरुवात केली. या निकालासह न्यूझीलंडनेवेस्ट इंडिज व पाकिस्तानविरुद्ध मायदेशातील चार कसोटी सामन्याची विजयी सुरुवात केली. न्यूझीलंड चार कसोटी सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आणि भारत व ऑस्ट्रेलियादरम्यानच्या कसोटी मालिकेचा निकाल त्यांच्यासाठी लाभदायक ठरला तर ते कसोटी मानांकनामध्ये अव्वल दोन संघांत स्थान मिळवू शकतात. वेस्ट इंडिजविरुद्ध २-० ने विजयाने न्यूझीलंड विश्व कसोटी चॅम्पियनशिप तालिकेत इंग्लंडला पिछाडीवर सोडत तिसऱ्या स्थानी दाखल होण्याची आशा आहे.विंडीजने कालच्या ६ बाद १९६ धावसंख्येवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्यांना डावाने पराभव टाळण्यासाठी १८५ धावांची गरज होती, पण विंडीजचा दुसरा डाव २४७ धावांत संपुष्टात आला.न्यूझीलंडने पहिला डाव ७ बाद ५१९ धावसंख्येवर घोषित केला होता. प्रत्युत्तरात विंडीजचा पहिला डाव १३८ धावांत संपुष्टात आला होता. न्यूझीलंडला रविवारी विजयासाठी १६ षटके प्रतीक्षा करावी लागली. काइल जेमीसन (२-४२) याने अल्जारी जोसेफला बाद करीत जर्मेन ब्लॅकवूडसोबतची त्याची सातव्या विकेटसाठी केलेली १५५ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. जोसेफने १२५ चेंडूंना सामोेरे जाताना ९ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ८६ धावा केल्या.विंडीजची दुसऱ्या डावात ६ बाद ८९ अशी अवस्था असताना ब्लॅकवूड व जोसेफ यांनी डाव सावरला. ब्लॅकवूडने आज आपले दुसरे कसोटी शतक पूर्ण केले. तो १४१ चेंडूंमध्ये १०४ धावा केल्यानंतर नील वॅगनरच्या (४-६६) गोलंदाजीवर बाद झाला. त्याने आपल्या खेळीत ११ चौकार व २ षटकार लगावले. वॅगनरने शेन गॅब्रिएलला (०) बोल्ड करीत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. शेन डाऊरिच दुखापतग्रस्त असल्यामुळे फलंदाजीला येऊ शकला नाही. 

टॅग्स :न्यूझीलंडवेस्ट इंडिज