Join us

NZ vs IND, 2nd ODI : शार्दूल ठाकूर नव्हे, तर कोहलीनं दुसऱ्या वन डेत प्रमुख गोलंदाजाला बसवलं

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातला दुसरा सामना आज ऑकलंड येथील ईडन पार्कवर होत आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 07:37 IST

Open in App

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातला दुसरा सामना आज ऑकलंड येथील ईडन पार्कवर होत आहे. न्यूझीलंडनं पहिला वन डे सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिकेतील आव्हान टीकवण्यासाठी टीम इंडियाला आजचा दुसरा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. आजच्या सामन्यात टीम इंडियात बदल पाहायला मिळतील हे सर्वांना अपेक्षित होतं आणि त्यानुसार संघात दोन बदल करण्यात आलेही. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. अपेक्षेनुसार कुलदीप यादव आणि शार्दूल ठाकूर यांना आज डच्चू मिळायला हवा होता. पण, त्यापैकी केवळ कुलदीपला बाकावर बसवण्याचा निर्णय घेतला गेला आणि शार्दूलऐवजी कोहलीनं प्रमुख जलदगती गोलंदाजाला बाकावर बसवलं. कोहलीची ही रणनीती किती यशस्वी होते हे सामन्यानंतरच कळेल. 

न्यूझीलंडने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचे कडवे आव्हान 4 विकेट्स राखून परतवले आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने 50 षटकांत 4 बाद 347 धावांचा एव्हरेस्ट उभारल्यानंतर यजमानांनी शांतपणे खेळ करताना 48.1 षटकांतच 6 बाद 348 धावा करुन बाजी मारली. अनुभवी फलंदाज रॉस टेलर नाबाद 109 धावा करुन सामनावीर ठरला. या सामन्यात भारताकडून श्रेयस अय्यर ( 103),  लोकेश राहुल ( नाबाद 88) आणि विराट कोहली ( 51) यांनी दमदार खेळी केली होती. त्याला न्यूझीलंडच्या रॉस टेलर ( नाबाद 109), हेन्री निकोल्स ( 78) आणि टॉम लॅथम ( 69) यांनी तोडीत तोड उत्तर दिले. 

पहिल्या सामन्यात कुलदीप यादवनं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या होत्या. पण, त्याचवेळी त्यानं 10 षटकांत 84 धावा दिल्या, त्यामुळे दुसऱ्या सामन्यात कोहली कुलदीपच्या जागी युजवेंद्र चहलला संधी देऊ शकतो. या सामन्यात शार्दूल ठाकूरही ( 9 षटकांत 80 धावा) महागडा ठरला होता. कोहलीनं कुलदीपच्या जागी आजच्या सामन्यात युजवेंद्र चहलला संधी दिली. पण, शार्दूलला कायम राखून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. शार्दूलला कायम ठेवताना कोहलीनं प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमीला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. त्याच्या जागी संघात नवदीप सैनीला खेळवण्यात आले आहे.

आगामी कसोटी मालिका लक्षात घेता कोहलीनं हा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये दोन कसोटी सामनेही खेळणार आहे. तत्पूर्वी शमीला पुरेशी विश्रांती मिळावी म्हणून त्याला आजच्या सामन्यात न खेळवण्याचा निर्णय घेतला गेला.

भारताचा अंतिम संघ - पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, केदार जाधव, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर.

 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडमोहम्मद शामीशार्दुल ठाकूरकुलदीप यादवयुजवेंद्र चहलविराट कोहली