भारतीय संघाच्या पराभवावर अखेर चौथ्या दिवशी शिक्कामोर्तब झाले. टीम साऊदी,ट्रेंट बोल्ट आणि पदार्पणवीर कायले जेमिसन यांच्या भेदक माऱ्यासमोर टीम इंडियाच्या मात्तबर फलंदाजांनी शरणागती पत्करली. न्यूझीलंड संघाने पहिल्या डावात आघाडी घेऊन टीम इंडियाचा पराभव निश्चित केला होता. पण, जगातील अव्वल कसोटी संघ इतक्या वाईट पध्दतीने पराभूत होईल, हे कुणाला अपेक्षित नव्हते. आता टीम इंडिया पराभूत झालीय म्हणून लगेच त्यांच्यावर टीकेचे बाण सोडणे योग्य नाही. हारजीत हा खेळाचा भाग आहे आणि पराभव हा तितक्याच खिलाडूवृत्तीने स्वीकारायचा असतो. फक्त तो स्वीकारताना केलेल्या चूकांचा पाढा पुढे गिरवला जाऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे.
सलामीचे अपयश...ट्वेंटी-२० मालिका निर्विवाद जिंकल्यानंतर टीम इंडियाला मोठा धक्का बसला तो रोहित शर्माच्या नसण्याचा. रोहितचे नसणे किती मारक ठरू शकते याची प्रचिती वन डे मालिकेत आली होतीच ती पहिल्या कसोटीतही जाणवली. पृथ्वी शॉची या सामन्यासाठी निवड होणे हे पक्के होते, परंतु त्याला पर्याय म्हणून समोर असलेल्या शुबमन गिलच्या फॉर्मकडे काणाडोळा करणे चूक होते. भारत अ संघासोबत न्यूझीलंड दौऱ्यावर आलेल्या शुबमनने द्विशतकी खेळी केली आहे. पृथ्वी हा नुकताच दुखापतीतून सावरला आहे. पण, शुबमन आणि पृथ्वी यांच्यात केवळ First come first basis च्या जोरावर पृथ्वीला संधी मिळाली. त्याचे अपयश हे संघासाठी घातकी ठरले. मयांक अग्रवालला ठिकठाक खेळ करता आला.
कुठे गेलाय विराट कोहलीचा आक्रमकपणा?एरवी आरे का कारे करणारा विराट कोहली या संपूर्ण दौऱ्यात हरवलेला दिसत आहे. आघाडीची फळी ढेपाळली तरी आपल्याकडे विराट आहे, हा विश्वास डगमगू लागला आहे. विराटने परदेशात अखेरचे कसोटी शतक केव्हा मारले, यासाठी आता खूप मागे जावं लागेल. न्यूझीलंडच्या खेळपट्टीवर कसोटी खेळणे हे तितके सोपे नाही आणि भारतच नव्हे तर चांगले संघही येथे अडखळलेले पाहायला मिळाले आहेत. पण, विराटचा क्लास पाहता तो कोणत्याही देशात आपली हुकुमत गाजवू शकतो. 14 डिसेंबर 2018नंतर विराटला परदेशात एकही कसोटी शतकं झळकावता आलेले नाही. विराटचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेची बाब आहे. यापूर्वी अनेकदा आघाडीची फळी अपयशी ठरल्यानंतर विराटनं आपल्या फटकेबाजीनं टीम इंडियाला अशक्यप्राय विजय मिळवून दिले आहेत. विराटला परदेशात पाच सामन्यांत अनुक्रमे 123, 17, 82, 0, 23, 9, 51, 76, 0, 2 आणि 19 अशा धावा केल्या आहेत.आता दुसऱ्या कसोटीत हरवलेला विराट सापडेल अशी अपेक्षा.
जसप्रीत बुमराहवर प्रचंड दडपण...न्यूझीलंडला रवाना होण्यापूर्वी जसप्रीत बुमराहने किमान दोन रणजी सामने खेळावे आणि आपल्या तंदुरुस्तीची चाचपणी करावी, ही अपेक्षा होती. दुखापतीनंतर त्याचा हा पहिलाच कसोटी दौरा होता. त्यामुळे संघातील प्रमुख गोलंदाजाच्या तंदुरुस्तीची चाचपणी होणे गरजेचे होते. पण, विराट आणि संघ व्यवस्थापन यांना बुमराहला खेळवण्याची एवढी का घाई लागलीय हे कळेनासे आहे. उमेश यादव चांगल्या फॉर्मात आहे आणि तो इशांत शर्मा व मोहम्मद शमीला चांगली साथे देऊ शकतो, हा विश्वास कदाचित विराटमध्येच नसावा. दुखापतीनंतर संघाचा प्रमुख गोलंदाज विकेट घेण्यात अपयशी ठरतोय आणि त्याला वेळ द्यायला हवी, या साध्या गोष्टीकडे विराट का दुर्लक्ष करतोय? ऑगस्ट 2019नंतर पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या बुमराहने पहिल्या कसोटीत 26.4 षटकांत 89 धावा देताना केवळ एक विकेट घेतली.
न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवामुळे विराटसेनेचे ICC Test Championship च्या गुणतालिकेत मोठे नुकसान
न्यूझीलंडसाठी हा विजय आहे खास; पटकावलं मानाच्या पंक्तीत स्थान!
पराभवानंतर विराट म्हणतो; नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरला, अन्...
न्यूझीलंडचा भारतावर १० गडी राखून विजय; मालिकेत आघाडी