Join us  

NZ vs IND, 1st Test : पराभवानंतर विराट म्हणतो; नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरला, अन्...

भारत विरुद्ध न्यूझीलंड, पहिली कसोटी : भारतीय संघाला दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात दारूण पराभव पत्करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 8:34 AM

Open in App
ठळक मुद्देटीम इंडियाला पहिल्या डावात 165 आणि दुसऱ्या डावात 191 धावा करता आल्या.न्यूझीलंडने पहिल्या डावात 348 धावा करून 183 धावांची आघाडी घेतली.सामन्यात दोन्ही डावांत मिळून नऊ विकेट्स घेणाऱ्या टीम साऊदी मॅन ऑफ दी मॅच

भारत विरुद्ध न्यूझीलंड, पहिली कसोटी : भारतीय संघाला दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात दारूण पराभव पत्करावा लागला. यजमान न्यूझीलंड संघानं दहा विकेट्स राखून टीम इंडियाला पराभूत केलं आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताला दुसऱ्या डावातही दोनशे धावांचा पल्ला ओलांडला आला नाही. भारताचा दुसरा डाव 191 धावांवर गडगडला आणि न्यूझीलंडसमोर विजयासाठी माफक 9 धावांचे लक्ष्य आले. यजमानांनी दहा चेंडूंत हा सामना जिंकला. 

न्यूझीलंडचा भारतावर १० गडी राखून विजय; मालिकेत आघाडी

न्यूझीलंडनं काल पहिल्या डावात 348 धावा केल्या. त्यामुळे त्यांच्याकडे 183 धावांची भक्कम आघाडी होती. यानंतर भारतीय फलंदाजी पुन्हा एकदा ढेपाळली. मयांक अगरवालनं अर्धशतक झळकावलं. मात्र कर्णधार विराट कोहलीसह भारताचे इतर फलंदाज अपयशी ठरले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी नाबाद होते. यावेळी भारताच्या 4 बाद 144 धावा झाल्या होत्या. भारतीय संघ त्यावेळी 39 धावांनी मागे होता आणि चौथ्या दिवशी टीम इंडियाला केवळ 47 धावा करता आल्या. चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होताच अवघ्या 79 मिनिटांमध्ये भारताचे सहा फलंदाज तंबूत परतले. न्यूझीलंडकडून टीम साऊदीनं 5, तर ट्रेंट बोल्टनं 4 गडी बाद केले. 

या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला,''नाणेफेकीचा कौल हा अत्यंत महत्त्वाचा होता. आमच्याकडे मात्तबर फलंदाजांची फौज होती, परंतु तरीही आम्हाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. 220-230 धावा जरी आम्ही केल्या असत्या तरी सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. पहिल्या डावातील अपयशानं आम्हाला मागे टाकलं आणि त्यात न्यूझीलंडने घेतलेल्या आघाडीमुळे दडपण वाढले. गोलंदाजांनी त्यांची कामगिरी योग्य बजावली. न्यूझीलंडच्या 7 विकेट्स पडल्या, तोपर्यंत सामन्यावर पकड होती. आम्हाला त्यांना 100 धावांच्या आघाडीच्या आतच गुंडाळता आले असते, परंतु त्यांच्या तळाच्या फलंदाजांनी डोकेदुखी वाढवली.''

पृथ्वी शॉची पाठराखण, पण...पृथ्वी शॉला दोन्ही डावांत अपयश आलं, तरीही कर्णधार कोहलीनं त्याची पाठराखण केली. तो म्हणाला,''पृथ्वी परदेशात केवळ दोन कसोटी खेळला आहे. त्यामुळे एका अपयशानं त्याच्याबाबत कठोर निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. तो यातून नक्की मार्ग काढेल आणि धावा करेल. मयांकने चांगली कामगिरी केली. अजिंक्य रहाणेनंतर या सामन्यात त्यानेच चांगली कामगिरी केली. धावांचा डोंगर उभा करून गोलंदाजांचं काम सोपं करण्याची आमची जबाबदारी आहे आणि तिच आमची ताकद आहे. पण, या सामन्यात फलंदाजांना अपयश आलं.''

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडविराट कोहलीजसप्रित बुमराहअजिंक्य रहाणेमयांक अग्रवालपृथ्वी शॉइशांत शर्मा