वेलिंग्टन : इंग्लंडच्या गोलंदाजांनी अखेरच्या टप्प्यात टिच्चून मारा करीत तिसºया वन डेत न्यूझीलंडच्या तोंडचा विजयी घास हिरावला. कर्णधार केन विलियम्सनच्या शतकी खेळीनंतरही यजमान संघ तिसºया वन डेत चार धावांनी पराभूत होताच, पाहुण्या संघाला पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी मिळाली.
मधली फळी कोसळल्यानंतर विलियम्सनने नाबाद ११२ धावा ठोकून विजयासाठी आवश्यक २३५ धावांचा पाठलाग केला; पण आठ गड्यांच्या मोबदल्यात २३० पर्यंतच मजल गाठता आली. न्यूझीलंडच्या फलंदाजांना आॅफ स्पिनर मोईन अली याने आवर घातला.
त्याने ३६ धावांत तीन तसेच आदिल राशीद याने ३४ धावांत दोन गडी बाद केले. त्याआधी, न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी इंग्लंडला २३४ पर्यंत मर्यादित ठेवले. न्यूझीलंडकडून लेग स्पिनर ईश सोढी याने ५३ धावांत तीन आणि ट्रेंट बोल्टने ४७ धावांत दोन गडी बाद केले.
विजयाचा पाठलाग करीत न्यूझीलंडची स्थिती २१ षटकांत दोन बाद ९७ अशी उत्तम होती. २५ व्या षटकांत सहा बाद १०३ अशी दाणादाण झाली. विलियम्सन आणि मिशेल सेंटनर (४१) यांनी सातव्या गड्यासाठी ९१ धावांची भागीदारी करीत विजयाच्या दारात आणून ठेवले होते.
अखेरच्या पाच षटकांत विजयासाठी ३६ धावांची गरज होती. ख्रिस व्होक्स याने तीन षटकांत १५ धावा देत इंग्लंडचा विजय साकार केला. व्होक्सच्या अखेरच्या षटकांत न्यूझीलंडला १५ धावांची गरज होती, पण विलियम्सन केवळ १० धावाच काढू शकला. त्याने शतकी खेळीत १० चौकार आणि दोन षटकार मारले.
त्याआधी, इंग्लंडकडूनही मोठी खेळी करण्यात सर्वच फलंदाजांना अपयश आले. इयोन मोर्गनने सर्वाधिक नाबाद ४८ धावा ठोकल्या. मागच्या सामन्याचा हिरो बेन स्टोक्स (३९), मोईन अली(२३) आणि जोस बटलरने २३ चेंडूत २९ धावांचे योगदान दिले.
(वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड : जे.जे. रॉय १५, जो रुट २०, इयॉन मॉर्गन ४८, बेन स्टोंक्स ३९, जोश बटलर २९, गोलंदाजी - टीम साऊदी १/४८, ट्रेंट बोल्ट २/४७, ग्रॅण्डहोम १/२४, ईश सोढी ३/५३ एकूण - ५० षटकांत सर्वबाद २३४ न्यूझीलंड - कॉलिन मुन्रो ४९, केन विलियम्सन ११२, मिशेल सेंटनर ४१, गोलंदाजी ख्रिस व्होक्स २/४०, अदिल राशीद २/४०, मोईन अली ३/३६ एकूण ५० षटकांत ८ बाद २३० धावा