हॅमिल्टन : कॉलिन डी ग्रँड होमच्या आक्रमक खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने चौथ्या वन-डे क्रिकेट सामन्यात पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. डी ग्रँड होमच्या ४० चेंडूंमध्ये नाबाद ७४ धावांच्या मदतीच्या जोरावर न्यूझीलंडने २६३ धावांचे लक्ष्य गाठले. या विजयासह न्यूझीलंडने पाच सामन्यांच्या मालिकेत ४-० ने आघाडी घेतली. न्यूझीलंडने सलग ११ विजयांचा नवा विक्रम नोंदवला.
गेल्या लढतीत केवळ ७४ धावांत गारद होणाºया पाकिस्तानने या लढतीत शानदार कामगिरी केली. एकवेळ पाकची २ बाद ११ अशी अवस्था झाली होती, पण मोहम्मद हाफीजने ८१ धावांची खेळी करीत संघाला सन्मानजनक मजल मारून दिली. फखर झमान, हॅरिस सोहेल आणि कर्णधार सर्फराज अहमद यांनीही अर्धशतके झळकावली. त्यानंतर युवा लेगस्पिनर शादाब खानने तीन बळी घेत न्यूझीलंडला रोखण्याचा प्रयत्न केला.