ख्राईस्टचर्च : न्यूझीलंडने पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या तिस-या व अखेरच्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यात मंगळवारी वेस्ट इंडिजचा डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर ६६ धावांनी पराभव करीत मालिकेत ३-० ने क्लीन स्वीप दिला.
पावसाच्या व्यत्ययामुळे सामना २३ षटकांचा करण्यात आला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १३१ धावांची मजल मारली. विंडीजला डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर १६६ धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले. लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजची सुरुवातीलाच ५ बाद ९ अशी अवस्था झाली होती. विंडीजला निर्धारित षटकांमध्ये ९ बाद ९९ धावांपर्यंत मजल मारता आली. विंडीज संघावर एकवेळ वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यात झिम्बाब्वेच्या निचांकी ३५ धावांवर बाद होण्याचे सावट होते. वेस्ट इंडिजतर्फे कर्णधार जेसन होल्डरने २१ चेंडूंमध्ये सर्वाधिक ३४ धावा केल्या. न्यूझीलंडतर्फे ट्रेंट बोल्ट व मिशेल सँटनर यांनी अनुक्रमे १८ व १५ धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी ३, तर मॅट हेन्रीने २ बळी घेतले.
त्याआधी, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने १९ षटकांत ३ बाद ८३ धावा केल्या होत्या. त्या वेळी पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबविण्यात आला. पुन्हा खेळ सुरू झाला त्या वेळी न्यूझीलंडला आणखी चार षटके खेळण्याची संधी मिळाली. त्यात त्यांनी ४८ धावांची भर घातली. रॉस टेलर ४७ धावा काढून नाबाद राहिला, तर टॉम लॅथमने ३७ धावांची खेळी केली.
विंडीजला यापूर्वी कसोटी मालिकेत २-०ने पराभव स्वीकारावा लागला आहे. उभय संघांदरम्यान तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत शुक्रवारपासून नेल्सनमध्ये सुरुवात होणार आहे. (वृत्तसंस्था)