- सुनील गावसकर
श्रीलंका संघ दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात केलेल्या फलंदाजीपासून प्रेरणा घेण्यासाठी प्रयत्नशील राहील. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर श्रीलंका संघाने कुसल मेंडिस व दिमूथ करुणारत्ने यांच्या माध्यमातून आक्रमक पवित्रा स्वीकारला. या दोन्ही फलंदाजांनी शानदार शतकी खेळी केली; पण अन्य फलंदाजांना मात्र मेंडिस व करुणारत्ने यांनी दाखविलेल्या लढवय्या वृत्तीचा कित्ता गिरविता आला नाही. कँडी येथील मैदानावरही मेंडिसने गेल्या वर्षी आॅस्ट्रेलियाविरुद्ध १७६ धावांची खेळी करीत श्रीलंका संघाच्या विजयाची मजबूत पायाभरणी केली होती. श्रीलंका संघाला मेंडिसकडून अशाच कामगिरीची पुनरावृत्ती अपेक्षित आहे. त्याचसोबत विराट कोहलीने नाणेफेकीचा कौल गमवावा अशी आशा आहे. त्यामुळे पाटा खेळपट्टीवर श्रीलंका संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळेल.
श्रीलंका संघाकडे भारताचा डाव दोनदा गुंडाळण्याची क्षमता असलेले गोलंदाज नाहीत, पण त्यात जर ते यशस्वी ठरले तर छोट्या लक्ष्याचा बचाव करण्याची क्षमता असलेले गोलंदाज भारतीय संघात नक्कीच आहेत. भारताची फलंदाजीची बाजू मजबूत आहे. भारतीय फलंदाज भेदकता नसलेल्या गोलंदाजांविरुद्ध खेळत असल्याची टीका होत आहे; पण तरी साधारण गोलंदाजीविरुद्धही फलंदाजांना धावा वसूल कराव्या लागतात, हे विसरता येत नाही.
पुजाराच्या रूपाने भारताकडे केवळ फलंदाजीवर प्रेम करणारा खेळाडू आहे. अन्य फलंदाजांची त्याला योग्य साथ लाभत आहे. तिसºया कसोटी सामन्याला जडेजा मुकणार असल्याचे निश्चित आहे. चांगल्या खेळपट्ट्यांवरही त्याच्याविरुद्ध धावा फटकावणे प्रतिस्पर्धी फलंदाजांसाठी आव्हान असते. कुलदीप यादवमुळे संघाच्या गोलंदाजीमध्ये विविधता आली आहे. अनुभवाने तो अधिक परिपक्व होईल.
‘स्लिप कॅचिंग’ या एका विभागावर भारतीय संघाला मेहनत घेण्याची गरज आहे. या विभागात सुधारणा केली तर यापूर्वीच्या दोन कसोटी सामन्यांच्या तुलनेत भारतीय संघाला या कसोटीत विश्रांतीसाठी आणखी एक दिवस जास्त मिळेल. (पीएमजी)