Join us  

भारतातर्फे सर्वाधिक बळी घेण्याचे स्वप्न- मोहम्मद सिराज

आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूतर्फे (आरसीबी) खेळणारा सिराज म्हणाला, तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळण्यास उत्सुक असून, त्याने आपल्या यशाचे श्रेय सहकारी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व ईशांत शर्मा यांना दिले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 6:14 AM

Open in App

चेन्नई : उदयोन्मुख वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज कसून मेहनत घेण्यास व मिळालेल्या संधीचा लाभ घेण्यास सज्ज आहे. भारतातर्फे सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होण्याचे त्याचे स्वप्न आहे. या २७ वर्षीय वेगवान गोलंदाजाने नोव्हेंबर २०१७ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध टी-२० आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर आतापर्यंत भारतातर्फे पाच कसोटी, एक वन-डे व तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूतर्फे (आरसीबी) खेळणारा सिराज म्हणाला, तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळण्यास उत्सुक असून, त्याने आपल्या यशाचे श्रेय सहकारी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व ईशांत शर्मा यांना दिले आहे.सिराजने आरसीबीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले, ‘मी ज्यावेळी गोलंदाजी करीत होतो, त्यावेळी जसप्रीत माझ्या मागे उभा असायचा. त्याने मला सांगितले की, आपल्या बेसिक्सवर कायम राहा आणि काही वेगळे करण्याची गरज नाही. त्याच्यासारख्या अनुभवी खेळाडूकडून शिकणे शानदार ठरले.’तो पुढे म्हणाला, ‘मी ईशांत शर्मासोबतही खेळलो आहे. तो १०० कसोटी सामने खेळला आहे. त्याच्यासोबत ड्रेसिंग रुम शेअर करणे शानदार अनुभव होता. माझे स्वप्न भारतातर्फे सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होण्याचे आहे. ज्यावेळी मला संधी मिळेल त्यावेळी मी मेहनत घेईन.’आतापर्यंत ३५ आयपीएल सामन्यात ३९ बळी घेणारा सिराज म्हणाला, ज्यावेळी सर्वप्रथम संघासोबत जुळलो, त्यावेळी माझे मनोधैर्य खचलेले होते. पण, कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध चांगली कामगिरी केल्यानंतर आत्मविश्वास उंचावला.’सिराज म्हणाला, आरसीबीचे फलंदाजी सल्लागार संजय बांगर यांच्याकडून चांगली प्रतिक्रिया मिळाल्यानंतर मी आक्रमक गोलंदाजी करणे कायम ठेवणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात पदार्पण केल्यानंतर सिराज चांगल्या फॉर्मात आहे. हा दौरा सिराजसाठी भावनात्मक होता. कारण ऑस्ट्रेलियामध्ये विलगीकरणादरम्यान त्याच्या वडिलांचे निधन झाले होते.भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांच्यासोबतच्या संबंधाबाबत बोलताना सिराज म्हणाला, ‘अरुण सर मला मुलाप्रमाणे मानतात. मी ज्यावेळी त्यांच्यासोबत चर्चा करतो, त्यावेळी ते माझे मनोधैर्य उंचावण्यासाठी प्रयत्नशील असतात.  ते मला नेहमी दिशा व टप्पा यावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगत होते.’

टॅग्स :मोहम्मद सिराज