Join us  

रणजी स्पर्धेतील मुंबईकरांची निराशाजनक कामगिरी कायम

केवळ एका गुणावर समाधान; अनिर्णीत सामन्यात महाराष्ट्राला ३ गुण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 12:51 AM

Open in App

मुंबई : रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत यजमान महाराष्ट्र आणि मुंबई यांच्यातील लढत रविवारी अपेक्षेनुसार अनिर्णीत सुटली. पहिल्या डावातील ७९ धावांच्या आघाडीच्या आधारे महाराष्ट्राने ३ गुणांची कमाई केली. मुंबई संघाला एका गुणावर समाधान मानावे लागले.महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) पुण्यातील गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेच्या मैदानावर पहिल्या डावात ३५२ धावा करणाऱ्या महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी मुंबईला २७३ धावांवर रोखून आघाडी घेतली. त्यानंतर दुसºया डावात सर्व बाद २५४ धावा करीत मुंबईसमोर ४७ षटकांत ३३४ धावांचे अवघड आव्हान ठेवले. प्रत्युत्तरात, दिवसाचा खेळ थांबला तेव्हा मुंबईने ५ बाद १३५ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात १०१ आणि दुसºया डावात ३७ धावा करणारा महाराष्ट्राचा सलामीवीर स्वप्निल गुगळे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.५ बाद ११२ वरून पुढे खेळताना महाराष्ट्राच्या उर्वरित ५ फलंदाजांनी आणखी १४२ धावांची भर घातली. १३ धावांवर नाबाद असलेला महाराष्ट्राचा कर्णधार राहुल त्रिपाठी याने प्रथम श्रेणी कारकिर्दीतील १०वे अर्धशतक पूर्ण केले. त्याने १२९ चेंडूंत ७६ धावांची सुरेख खेळी करताना एक षटकार आणि ७ चौकार लगावले. ३ धावांवर नाबाद असलेल्या सत्यजीत बच्छावने (१०६ चेंडूंत ३७ धावा, १ षटकार, ३ चौकार) त्याला चांगली साथ दिली. या दोघांनी आज सकाळच्या सत्रात मुंबईच्या गोलंदाजांचा समर्थपणे सामना केला. त्यांनी सहाव्या गड्यासाठी ९७ धावांची भागीदारी केली. मुंबईतर्फे शिवम दुबे आणि शिवम मल्होत्रा यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.आदित्य तरे-शुभम रांजणे जोडीने मुंबईला वाचविले. विजयासाठी ३३४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाºया मुंबईने ही लढत अनिर्णीत राखण्याच्या दृष्टीने बचावात्मक प्रारंभ केला. मात्र, महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी आक्रमक मारा करीत १२व्या षटकांत मुंबईची अवस्था ४ बाद ४४ अशी वाईट केली. सलामीवीर जय बिश्त (६), कर्णधार सिद्धेश लाड (१८), सूर्यकुमार यादव (५) आणि अरमान जाफर (०) या आघाडीच्या फलंदाजांनी निराशा केली. त्या वेळी गोलंदाज महाराष्ट्राला यंदाचा पहिला विजय मिळवून देणार, अशी शक्यता निर्माण झाली होती. कारण उर्वरित ६ फलंदाज ३५ षटकांत माघारी परतवणे फार अवघड नव्हते.आदित्य तरे व शुभम रांजणे या जोडीने सहाव्या गड्यासाठी २२.३ षटकांत ६३ धावांची भागीदारी करीत मुंबईचा पराभव टाळला. आदित्यने १२५ चेंडंूत नाबाद ५२ धावांच्या खेळीत ७ चौकार लगावले. शुभमने ७८ चेंडूंत २ षटकार व एका चौकारासह ३५ धावा केल्या. महाराष्ट्रातर्फे आशय पालकरने २, तर अनुपम संकलेचा, मुकेश चौधरी व सत्यजीत बच्छाव यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.संक्षिप्त धावफलक :महाराष्ट्र (पहिला डाव) : सर्व बाद ३५२ धावा.मुंबई (पहिला डाव) : सर्व बाद २७३ धावा.महाराष्ट्र (दुसरा डाव) : ९०.१ षटकांत सर्व बाद २५४ (राहुल त्रिपाठी ७६, चिराग खुराणा ३८, स्वप्निल गुगळे ३७, सत्यजीत बच्छाव ३७; शिवम दुबे ३/२५, शिवम मल्होत्रा ३/४१).मुंबई (दुसरा डाव) : ४७ षटकांत ५ बाद १३५ (आदित्य तरे नाबाद ५२, शुभम रांजणे ३५; आशय पालकर २/२३).

टॅग्स :रणजी करंडकमुंबई