नवी दिल्ली : मुसंडी मारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबई इंडियन्सपुढे आज रविवारी आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध ‘करा किंवा मरा’ या निर्धारासह विजय मिळविण्याचे आव्हान असेल. प्ले आॅफमध्ये धडक देण्यास मुंबई संघ आतूर आहे.
दिल्ली संघ आधीच शर्यतीबाहेर पडला; पण काल चेन्नईवर ३४ धावांनी मिळविलेल्या विजयानंतर त्यांच्या युवा खेळाडूंमध्ये आत्मविश्वास संचारला. हे युवा खेळाडू रोहित अॅन्ड कंपनीसाठी धोकादायक ठरू शकतात. मुंबई पराभवानंतर विजयी वाटेवर परतली; पण याआधी उभय संघांत झालेल्या सामन्यात दिल्लीने मुंबईला सात गड्यांनी नमविले होते.
सूर्यकुमारच्या ५०० धावा वगळता मुंबईच्या अन्य फलंदाजांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसला. २७३ धावांचे योगदान देणाऱ्या रोहितचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. अशावेळी पंजाबविरुद्ध अर्धशतकी खेळी करणारा कीरोन पोलार्ड याच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील. याशिवाय इविन लुईस सलामीला कसा खेळतो, यावर पुढील वाटचाल ठरणार आहे. हार्दिक आणि कुणाल या पंड्या बंधूंना संघाच्या मदतीला धावून यावे लागणार आहे. गोलंदाजीत बुमराह तसेच पंड्या बंधूंवर पुन्हा एकदा भेदक माºयाची जबाबदारी असेल. दिल्लीसाठी हे सत्र निराशादायी ठरले. उत्कृष्ट खेळाडू आणि कोच राहिालेला महान खेळाडू रिकी पाँटिंग संघाला दमदार विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे आल्यानंतर संघाची कामगिरी थोडी फार सुधारली, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. (वृत्तसंस्था)
पाच संघांत चुरस...
आकडेवारीनुसार प्ले आॅफ शर्यतीत पाच संघ आहेत. सनरायझर्स हैदराबादचे १३ सामन्यांत १८ आणि चेन्नई सुपरकिंग्जचे १३ सामन्यांत १६ गुण असल्याने पहिल्या आणि दुसºया स्थानावर आहेत. याशिवाय चार संघांचे प्रत्येकी १२-१२ गुण आहेत. मुंबई इंडियन्सला ‘प्ले आॅफ’साठी सामना जिंकावा लागेल; शिवाय सनरायझर्सचा अखेरचा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गमवू नये, यासाठीही प्रार्थना करावी लागणार आहे. केकेआरचे १३ सामन्यांत १४ गुण आहेत. केकेआरने सामना जिंकल्यास प्ले आॅफचा निर्णय धावगतीच्या आधारे होईल.
वेळ : दुपारी ४ वाजता
स्थळ : फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली