Join us  

मुंबईची धुरा आदित्य तरेच्या खांद्यावर, प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंना संधी

देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठेच्या रणजी चषक स्पर्धेसाठी बलाढ्य मुंबई संघ सज्ज झाला असून कर्णधार आदित्य तरेच्या नेतृत्त्वाखालील संघाची सोमवारी घोषणा करण्यात आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2017 9:24 PM

Open in App

मुंबई : देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठेच्या रणजी चषक स्पर्धेसाठी बलाढ्य मुंबई संघ सज्ज झाला असून कर्णधार आदित्य तरेच्या नेतृत्त्वाखालील संघाची सोमवारी घोषणा करण्यात आली. गतमोसमाचे उपविजेते असलेल्या मुंबईच्या उपकर्णधारपदी अनुभवी सुर्यकुमार यादवची निवड करण्यात आली असून युवा पृथ्वी शॉ सध्या भारत ‘अ’ संघाकडून खेळत असल्याने त्याचा सध्या मुंबई संघासाठी विचार झालेला नाही.

त्याचबरोबर स्टार खेळाडू रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे भारताच्या राष्ट्रीय संघातून खेळत असून श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर आणि धवल कुलकर्णी हे महत्त्वाचे त्रिकूटही भारत ‘अ’ आणि अध्यक्षीय एकादश संघातून खेळत असल्याने यांचीही विद्यमान मुंबई संघामध्ये निवड झालेली नाही. 

प्रमुख खेळाडूंची संघात निवड न झाल्याचा फायदा युवा खेळाडूंना झाला असून आकाश पारकर, रॉयस्टन डायस, मिनाद मांजरेकर, शिवम मल्होत्रा, शुभम रांजणे आणि एकनाथ केरकर यांना मुंबईतून आपली छाप पाडण्याची संधी मिळाली आहे. आगामी १४ ते १७ आॅक्टोबर दरम्यान मुंबई आपला पहिला सामना इंदूर येथील होळकर स्टेडियममध्ये मध्य प्रदेशविरुद्ध खेळेल. यानंतर, मुंबई घरच्या वानखेडे स्टेडियमवर तुल्यबळ तामिळनाडूविरुद्ध दोन हात करेल. 

निवडण्यात आलेला मुंबई संघ :

आदित्य तरे (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), अभिषेक नायर, अखिल हेरवाडकर, सिध्देश लाड, जय बिस्त, सुफियान शेख, विजय गोहिल, आकाश पारकर, रॉयस्टन डायस, मिनाद मांजरेकर, आदित्य धुमाळ, शिवम मल्होत्रा, शुभम रांजणे आणि एकनाथ केरकर

निवडणूक पुढे ढकलली...

सोमवारी झालेल्या बैठकीत मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) आपली द्वैवार्षिक निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. याआधी १० नोव्हेंबरला ‘एमसीए’ची निवडणूक होणार होती. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या लोढा समितीच्या शिफारसींबाबत संभ्रम कायम असल्यामुळे  एमसीए निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.  

टॅग्स :क्रिकेट