Join us  

500 व्या रणजी सामन्यात मुंबईने केली निराशा, उदयोन्मुख स्टार पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे शुन्यावर बाद

पॅव्हेलियनमध्ये मुंबईचे अनेक दिग्गज क्रिकेटपटू उपस्थित होते. आतापर्यंत मुंबईचे 70 क्रिकेटपटू भारतीय संघातून खेळले आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2017 3:54 PM

Open in App
ठळक मुद्दे 46 वेळा रणजी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणा-या मुंबईच्या संघाने 41 वेळा रणजी चषक उंचावला आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला बीकेसी येथे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

मुंबई - रणजी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी संघ असलेल्या मुंबईने आज आपल्या ऐतिहासिक 500 व्या रणजी सामन्यात अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. बडोद्याविरुद्ध मुंबईचा पहिला डाव अवघ्या 171 धावात आटोपला. कर्णधार आदित्य तरेच्या (50) अर्धशतकाचा अपवाद वगळता मुंबईच्या अन्य फलंदाजांनी बडोद्याच्या गोलंदाजीसमोर सपशेल नांगी टाकली. बडोद्याचे वेगवान गोलंदाज अतित शेठ आणि लुकमॅन मीरीवाला या दोघांनीच मुंबईचा संपूर्ण संघ गारद केला. 

दोघांनी प्रत्येकी पाच-पाच विकेट घेतल्या. या मोसमात खो-याने धावा काढणारा मुंबईचा उदयोन्मुख क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि भारताचा सलामीवीर अजिंक्य रहाणे शुन्यावर बाद झाले. श्रेयस अय्यर (28), सुर्यकुमार यादव (10), सिद्धेश लाड (21) आणि अभिषेक नायर (10) हे मुंबईचे भरवशाचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. खरतर ही 500 वी रणजी लढत मुंबईसाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण या सामन्यातील जय-पराजय पुढची अनेकवर्ष स्मरणात राहिल. 

या सामन्यात पराभव झाला तर मुंबई संघासाठी पुढचा प्रवास खडतर होऊ शकतो. 46 वेळा रणजी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणा-या मुंबईच्या संघाने 41 वेळा रणजी चषक उंचावला आहे. आजच्या या सामन्याला पॅव्हेलियनमध्ये मुंबईचे अनेक दिग्गज क्रिकेटपटू उपस्थित होते. आतापर्यंत मुंबईचे 70 क्रिकेटपटू भारतीय संघातून खेळले आहेत. 

या सामन्याच्या पूर्वसंध्येला बीकेसी येथे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी एमसीएचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि विद्यमान अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई संघाचे नेतृत्व केलेल्या सर्व कर्णधारांचा विशेष सत्कार करण्यात आला.

मुंबई क्रिकेटपटूंना कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याच्या वृत्तीमुळे त्यांना ‘खडूस’ म्हणून ओळखले जाते आणि याच खडूसपणाच्या जोरावर अनेक हाताबाहेर गेलेले सामने मुंबईकरांनी आश्चर्यकारकपणे जिंकले आहेत.

मुंबई क्रिकेटच्या योगदानाबद्दल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने म्हटले की, ‘मुंबई रणजी संघाने सर्वाधिक शानदार खेळाडू दिले आहेत. रणजी स्पर्धेच्या निमित्ताने देशातील काही सर्वोत्तम खेळाडूंच्या सोबत आणि त्यांच्या विरुद्ध खेळताना आमच्या खेळाडूंनी खूपकाही शिकले आहे. प्रत्येक मुंबईकर खेळाडूला मुंबई संघाची कॅप परिधान करताना गर्व वाटतो. याला सोपी गोष्ट न मानने आणि भूतकाळातील यशावर समाधानी न राहणे, यामुळेच मुंबई रणजी संघाने अनेक वर्षे दबदबा निर्माण केला आहे.’

टॅग्स :रणजी चषक 2017क्रिकेट