मुंबई : रणजी चषक क्रिकेट स्पर्धेच्या बाद फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी अखेरची साखळी लढत जिंकणे अनिवार्य असलेल्या सामन्यात बलाढ्य मुंबई संघ घरच्या मैदानावर त्रिपुराच्या आव्हानाला सामोरे जाईल. ‘क’ गटातील या सामन्यात मुंबईचा पराभव झाला, तर त्यांच्यावर गटसाखळीतच आपला गाशा गुंडाळण्याची नामुष्की येईल.
वानखेडे स्टेडियमवर होणाºया या सामन्यात मुंबईकर त्रिपुराला गृहीत धरण्याची चूक कदापि करणार नाही. यंदाच्या मोसमात लौकिकास साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या मुंबईने ५ सामन्यांतून १४ गुणांची कमाई केली आहे. त्यापैकी केवळ एक सामना जिंकण्यात यश मिळवले आहे, तर चार सामने अनिर्णित राखण्यात मुंबईकरांना समाधान मानावे लागले. ‘क’ गटात आंध्र प्रदेश १९ गुणांसह अव्वल स्थानी असून मध्य प्रदेश १५ गुणांसह द्वितीय स्थानी आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू समीर दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या मोसमात मुंबईला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. मुंबईला एकमेव विजय भुवनेश्वर येथे ओडिशाविरुद्ध मिळवता आला. तसेच, त्यांनी चार सामने अनिर्णित राखले. दुसरीकडे, त्रिपुराचे चार गुण असून, बाद फेरी गाठण्याच्या त्यांच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.
त्रिपुराविरुद्ध मुंबईला पहिल्या डावात आघाडीवरील गुणावर समाधान मानावे लागले, तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना बाद फेरीसाठी मध्य प्रदेशचा पराभव आवश्यक राहिल. फलंदाजीमध्ये सध्या तुफान फॉर्म असलेला पृथ्वी शॉवर मुंबईची मुख्य मदार असेल यात वाद नाही. त्याच्यासह, अनुभवी श्रेयश अय्यर, सूर्यकुमार यादव, सिध्देश लाड ंआणि कर्णधार आदित्य तरे यांच्यावरही जबाबदारी असेल. शार्दुल ठाकूर, धवल कुलकर्णी, विजय गोहिल यांच्यासह अष्टपैलू आकाश पारकर मोलाचे योगदान देऊ शकतो.
सध्या सुरु असलेल्या भारत - श्रीलंका कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात समावेश असलेल्या रोहित शर्मासाठी मुंबईकर प्रयत्नशील होते. पहिल्या सामन्याप्रमाणे दुसºया सामन्यातही रोहितला संधी न मिळाल्यास त्याला रणजी खेळण्यास मुक्त करावे, अशी विनंती मुंबई संघाने ‘बीसीसीआय’कडे केली होती.
।यातून निवडणार संघ
मुंबई : आदित्य तरे (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), जय बिस्ता, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, सिध्देश लाड, आकाश पारकर, कर्ष कोठारी, धवल कुलकर्णी, शार्दुल ठाकूर, मिनाद मांजरेकर, विजय गोहिल, अखिल हेरवाडकर आणि सुफियान शेख.
त्रिपुरा : मनिशंकर मुरासिंग (कर्णधार), उदियन बोस (उपकर्णधार), जॉयदिप बानिक, राजेश बानिक, द्वैपायन भट्टाचारजी, जॉयदीप भट्टाचारजी, अभिजीत डे, बिशल घोष, गुरींदर सिंग, स्मित पटेल, राणा दत्ता, अभिजीत सरकार, अजॉय सरकार, सम्राट सिंघा आणि यशपाल सिंग.